Join us

२० हजार एजंटसची नोंदणी स्थगित, एजंट म्हणून व्यवसाय करण्यावर बंदी

By सचिन लुंगसे | Published: May 23, 2024 1:51 PM

या सर्वांची नोंदणी महारेराने वर्षभरासाठी स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एजंटसनी महारेराचे प्रशिक्षण पूर्ण करून, परीक्षा देऊन प्रमाणपत्र संकेतस्थळावर नोंदविल्याशिवाय त्यांना व्यवसाय करता येणार नाही, असे महारेराने जाहीर केले आहे.  सुमारे २० हजार एजंटसनी अद्यापही या अटींची पूर्तता केलेली नाही आणि केली असल्यास प्रमाणपत्र संकेतस्थळावर नोंदवलेले नाही. या सर्वांची नोंदणी महारेराने वर्षभरासाठी स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

एक वर्षाच्या कालावधीत त्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून, प्रमाणपत्र प्राप्त करून, संकेतस्थळावर नोंदवले तर त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात येईल. वर्षाच्या कालावधीत जे प्रतिसादच देणार नाहीत त्यांची नोंदणी वर्षानंतर आपोआप रद्द होईल.  त्यानंतर ६ महिने त्यांना अर्जही करता येणार नाही. ६ महिन्यानंतर नव्याने नोंदणी घेता येईल. या काळात त्यांना व्यवहार करता येणार नाही. या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

मे २०१७ ला महारेरा स्थापन झाल्यापासून आतापर्यंत सुमारे ४७ हजार एजंटसनी महारेराकडे नोंदणी केलेली आहे. यापैकी १३७८५ एजंटसनी आपल्या परवान्याचे नूतनीकरण न केल्यामुळे त्यांची नोंदणी रद्द केल्याचे यापूर्वीच महारेराने जाहीर केलेले आहे.

महारेराने एजंटसना प्रशिक्षण घेऊन, परीक्षा देऊन प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक केलेले आहे. १० जानेवारी २३ ला घेतलेल्या या निर्णयाला अनेकदा मुदतवाढ देऊन अखेर १ जानेवारी २४ नंतर तो सर्व एजंटससाठी बंधनकारक करण्यात आला. तरीही पात्रता नसलेले २० हजाराच्यावर एजंटस या क्षेत्रात कार्यरत आहेत. हे निदर्शनास आल्यानंतर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्यात आले. गरज पडल्यास या अपात्र एजंटसची सेवा घेणाऱ्या विकासकांची महारेरा नोंदणी रद्द करायला महारेरा कचरणार नाही. तशी वेळ विकासकांनी महारेरावर आणू नये. - अजय मेहता, अध्यक्ष,  महारेरा

टॅग्स :महारेरा कायदा 2017