Join us

‘त्या’ तरुणाच्या मृत्यूप्रकरणी संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 2:39 AM

पावसाळ्यात नाल्यातील कामादरम्यान खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून नागेंद्र नागार्जुन या तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला.

मुंबई : पावसाळ्यात नाल्यातील कामादरम्यान खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून नागेंद्र नागार्जुन या तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला. स्थानिक नगरसेवकाने हे काम हाती घेतले आहे. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. येथील खड्डा न दिसल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मालाडच्या एव्हरशाइन परिसरात राहणारे एक गृहस्थ जॉगिंगसाठी निघाले होते. तेव्हा त्यांना हिमाचल इमारतीच्या मागील बाजूस काही तरी तरंगताना दिसले. ‘मला वाटले एखादा नारळ पाण्यात तरंगत आहे. त्यामुळे मी एक लाकडाचा बांबू घेऊन त्याला ढकलण्यास सुरुवात केली. तेव्हा मला नाक, तोंड आणि डोळे दिसले आणि मी घाबरलो. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून याबाबत कळविले. काही मुले त्या ठिकाणाहून येत होती. त्यांना मी या मुलाची ओळख विचारली. पाण्यात बुडालेला मुलगा आमच्या शेजारी राहत असल्याचे सांगत एकाने धावत जाऊन त्याच्या कुटुंबातील लोकांना बोलावून आणले,’ अशी माहिती त्यांनी दिली.नगरसेवकाने गटार बनविण्यासाठी हा खड्डा खणला होता. मात्र, त्याचे काम अर्धवट सोडल्याने मुलाला जीव गमवावा लागला, असाही आरोप स्थानिकांकडून होत आहे. बांगूरनगर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून चौकशी सुरू आहे.एव्हरशाइन नगर परिसरात अनधिकृतपणे भरणी सुरू होती. त्यामागे नेवडा पुतमन या व्यक्तीचा हात आहे. या भरणीमुळे नाल्याचे पाणी बाहेर न जाता आसपासच्या परिसरात भरते आणि तलावासारखी परिस्थिती निर्माण होते. हे पाणी बाहेर घालविण्यासाठी दरवर्षी आम्हाला चरी मारावी लागते. कारण गटार बनविण्यासाठी या ठिकाणी पुरेशी जागा नाही. त्यामुळे तो खड्डा नसून चरी आहे, ज्या पाण्यात आसपासची मुले पोहण्यासाठी येतात. असाच प्रकार घडला असावा. कारण त्याच्या चप्पल बाहेरच्या बाजूला सापडल्या आहेत. अनधिकृत भरणीबाबत पोलीस तक्रारदेखील केली होती. मात्र नगरसेवक असल्याने विनाकारण मला यात गोवले जात आहे, असे नगरसेवक जया तिवाना यांनी सांगितले.नेवडा पुतमन यांनी सांगितले, ज्या ठिकाणी नागार्जुनचा मृत्यू झाला तो खाडी परिसर आहे. त्यामुळे खाडीमध्ये भरपावसात कोणी पोहायला का जाईल? त्या ठिकाणी गर्दुल्ले आणि मद्यपींचे अड्डे आहेत. यापूर्वी तीन ते चार वेळा अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे माझा त्या प्रकरणाशी काडीचाही संबंध नाही.अन्य काही दुर्घटनाबोरीवली पश्चिमच्या शिंपोली, दुर्गाधामलगत असलेली महापालिकेची भिंत तेथील रहिवाशांच्या घरावर पडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. माहिती मिळताच घटनास्थळी फायर ब्रिगेड व माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी त्वरित धाव घेतली. भिंत कोसळून घडलेल्या अपघातात जीवितहानी झालेली नसली तर वित्तहानी झाली आहे.कांदिवली पश्चिम इंद्रानगरमध्ये पोयसर नदीच्या किनारी असलेल्या दोन झोपड्या वाहून गेल्या. मात्र, यात जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तर पी/उत्तर विभागात पालिकेच्या कचरा गाडीचा टायर खड्ड्यात अडकल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.