उघड्यावर लघुशंका कराल, तर भरावा लागेल दोनशेचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 09:42 AM2023-12-04T09:42:31+5:302023-12-04T09:43:27+5:30
अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त करणाऱ्या या कृत्यासाठी पालिकेच्या नियमाप्रमाणे दंड आकारणी करण्याच्या सूचना आहेत.
मुंबई : महानगरपालिका मुंबई स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असताना दुसरीकडे, मात्र आजही उघड्यावर लघुशंका करणे आणि आंघोळ करण्यासारखे प्रकार सर्रास सुरू असल्याचे दिसून येत आहे. महत्त्वाचे म्हणजे परिसर अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त करणाऱ्या या कृत्यासाठी पालिकेच्या नियमाप्रमाणे दंड आकारणी करण्याच्या सूचना आहेत. परंतु, प्रत्यक्षात तसे होताना मात्र दिसत नाही. मुंबई महानगर प्रदेशात उघड्यावर विविध अस्वच्छता करणाऱ्यांसाठी २४ वर्गवाऱ्या असून, त्यापैकी उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांसाठी २०० रुपयांचा दंड आहे.
कचरा जाळणाऱ्यांवर नजर :
सध्या वायू प्रदूषणाची समस्या मोठी असून, मुंबईतील हवेच्या प्रदूषणात सोसायट्या आणि सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर जाळण्यात येणारा कचरा आणखी भर टाकत आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईत कोणी कचरा जाळताना आढळल्यास त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाइनवर करा.
पालिका अशा लोकांवर कारवाईचा बडगा उगारेल, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अ) एकाच आवाराच्या मालकांसाठी १००० रुपये
ब) इतरांसाठी १०,००० रुपये.
किती आहे दंडाची तरतूद
जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करून उपद्रव निर्माण करतात, अशा उपद्रवकारकांवर दंडात्मक कारवाई होते. यासाठी पालिकेच्या नियमांप्रमाणे तब्बल २४ प्रकारची वर्गवारी असून, १०० रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.फक्त तुम्हीच नाही तर तुमच्या पाळीव प्राण्यानेही घाण केल्यास त्याचाही दंड तुम्हाला भरावा लागू शकतो. ठरवून दिलेल्या ठिकाणांऐवजी अन्य ठिकाणी प्राणी-पक्षांना खाऊ घातल्यासही पैशाच्या स्वरूपात दंड भरावा लागू शकतो.
याशिवाय कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास बांधकाम-पाडकामाचा कचरा विभक्त करून न दिल्यास, कोंबड्या- मासळीचा कचरा वेगळा न केल्यास, सार्वजनिक मेळावे-कार्यक्रमानंतर २४ तासांत स्वच्छता न केल्यास अशा १५ प्रकारांसाठीही दंडाची तरतूद आहे.
घनकचरा व्यवस्थापनातील तक्रारी वेळच्यावेळी निकालात काढण्यासाठी गृह व नागरी व्यवहार मंत्रालयाने विकसित केलेले स्वच्छता ॲप व मुंबई महानगरपालिकेचे २४४ ७ ॲपचे एकीकरण करण्यात आले. मुंबईमधील स्वच्छता ॲप तक्रार निवारण हे ९९ टक्कांपेक्षा अधिक आहे. तसेच स्वच्छता ॲपवरील तक्रारीचे नियमितपणे परीक्षण केले जात असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येते.