लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : घरातील किरकोळ वादाला पोलिसांच्या दारी घेऊन गेल्यावर अनेकजण घाबरतात. मात्र, खाकी वर्दीतील माणुसकीने कौटुंबिक वाद न वाढविता ते सामोपचाराने मिटविण्यास प्राधान्य दिले आहे. मोबाइल पर्यायाने सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे मोडण्याच्या उंबरठ्यावर असलेले अनेक संसार मुंबई पोलिसांच्या महिला साहाय्य कक्षाने वाचवले आहेत.
कोरोनाच्या काळात अनेकांच्या जीवनशैलीत बदल झाले. चार भिंतीआड कैद झाल्यामुळे कुठे नाती एकत्र आली तर कुठे वादाच्या घटना वाढल्या. प्रत्येकाच्या हाती आलेला स्मार्टफोन आणि त्याच्या अतिरेकी वापरामुळेही अनेकांचे संसार अडचणीत आले आहेत. यावर पती-पत्नी दोघांचे समुपदेशन करत संसार सावरण्याचे काम पोलिसांचा महिला साहाय्य कक्ष करत आहे. मोबाइल फोनच्या वापराचा अतिरेक आता मानवी जीवनाच्या सर्वच घटकांवर पडताना दिसून येत आहे. अशातच पती व पत्नी या नाजूक संबंधाच्या नात्यावरही परिणाम होतो. पोलिसांकडून समुपदेशन केले जाते.
...म्हणून थेट न्यायालयात
अनेक घटनांमध्ये पती अथवा पत्नी पोलिसांचेही म्हणणे ऐकून घेत नाही. अशावेळी ही प्रकरणे थेट न्यायालयात जातात.प्रलंबित अर्जावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून महिला कक्षाकडे प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी दोन्ही कुटुंबातील सदस्यांना बोलावले जाते. वादाचे कारण शोधले जाते.
मोबाइल अन् व्हॉटस्ॲप हेच सर्वात मोठे कारण
महिला कक्षाकडे असलेल्या पती-पत्नीच्या वादामध्ये मोबाइल हेच कारण आहे. व्हॉटस्ॲपचा वापरही वादात ठिणगी पाडण्याचे काम करतो.
समेट घडवून आणण्याचा प्रयत्न
कुटुंबातील वाद पोलिसांपर्यंत आल्यानंतर थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी महिला अधिकारी व कर्मचारी सुरुवातीला त्यांचे पूर्ण म्हणणे ऐकून घेऊन पुढील कार्यवाही करतात. महिला कक्षाकडून अनेक प्रकरणांत समेट घडवून संसार जोडण्याचे काम या माध्यमातून करण्यात येत आहे.
शेकडो अर्ज
स्वतंत्र महिला कक्ष कार्यान्वित आहे. या ठिकाणी आलेल्या तक्रारीवर लगेच कारवाई न होता कुटुंबाचे म्हणणे ऐकून घेतले जाते. गेल्या सात महिन्यांत शेकडो तक्रारी आल्या आहेत.