ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकाची गुह्यांत मदत?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसुख हिरन यांची ठाण्याच्या गायमुख परिसरात हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह रेती बंदर येथील खाडीत फेकण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. यात, ठाणे येथील प्रभारी वरिष्ठ निरिक्षकाने त्यांना रेती बंदर परिसरात आणण्यास मदत केल्याचा संशय एनआयएला असून, त्या दिशेने तपास सुरू आहे.
एनआयएच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी मनसुख यांना कॉल करून बोलावून घेतले. पुढे सचिन वाझे आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य साथीदार मनसुखसोबत निघाले. त्यानंतर गायमुख परिसरात बराच वेळ त्यांचे वाहन थांबले होते. याच ठिकाणी त्यांची हत्या केल्याचा संशय एनआयएला आहे. तेथून त्यांचा मृतदेह रेतीबंदरच्या दिशेने नेला. यात, वाटेत कोणी अडवू नये म्हणून ठाण्यातील एक वरिष्ठ निरीक्षकही वाहनात उपस्थित होते. त्यामुळे या अधिकाऱ्यालाही यात अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गायमुख येथील काम झाल्यानंतर वाझे मुंबईच्या दिशेने आले. तेथे आल्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून रात्री साडेदहाच्या सुमारास ते ठाण्याहून मुंबईच्या दिशेने येण्यासाठी रवाना झाले आणि फ्री वेवरून ते मुंबईत पोहोचले. फ्री वे उतरल्या उतरल्या सर्वांत जवळचे पोलीस ठाणे हे डोंगरी असल्याने त्यांनी बारवर कारवाई दाखविण्यासाठी हे पोलीस ठाणे निवडले होते. वाझे डोंगरी पोलीस ठाण्याजवळ असतानाचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
सिमकार्डही केले नष्ट
यातील अन्य साथीदारांनी दोन वेगवगेळ्या ठिकाणी सिमकार्डही नष्ट केले. त्यामुळे मनसुख यांचे दोन लोकेशन दाखविण्यात आले होते.
डान्सबार मालकाकडे चौकशी
३ मार्च रोजी एक डान्स बार मालक आपल्या मर्सिडीजमधून पोलीस आयुक्त कार्यालयात आला? होता. जवळपास चार ते पाच तास तो सीआययूच्या कार्यालयात उपस्थित होता. तेव्हा वाझे, विनायक शिंदेसह गुन्हे शाखेतील एक प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकही तेथे हजर होता. त्यामुळे ही मंडळी येथे काय करत होती? तो डान्स बारमालक तेथे का आला? यासाठी त्यालाही गुरुवारी चौकशीसाठी बोलाविण्यात आल्याची माहिती समजते आहे.
११ मिनिटे संभाषण... कॉलमागे वाझे कनेक्शन
०४ मार्चच्या रात्री मनसुख हे तावडे नावाच्या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र तावडे नाव सांगणाऱ्या त्या व्यक्तीसोबत मनसुख यांचे ११ मिनिटे संभाषण झाल्याचे समोर आले आहे. तो व्यक्ती मनसुख यांच्या ओळखीचा असल्याशिवाय ते त्याच्याशी एवढा वेळ बोलणे शक्य नसल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.