महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 06:10 AM2019-04-24T06:10:02+5:302019-04-24T06:10:06+5:30
गुन्हे शाखेची कारवाई; दोन अभिनेत्रींसह राज्यभरातील आठ जणींकडून उकळली खंडणी
मुंबई : कास्टिंग डायरेक्टर असल्याचे खोटे सांगून महिलांशी संवाद साधून पुढे त्यांचे फोटो वापरून अश्लील व्हिडीओ तयार करणाऱ्या आणि त्यानंतर ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत, खंडणी उकळणाºया विकृताला गुन्हे शाखेच्या वांद्रे कक्षाने मंगळवारी अटक केली. सिद्धार्थ सरोदे असे त्याचे नाव आहे. त्याने आतापर्यंत दोन अभिनेत्रींसह राज्यभरातील आठ महिलांकडून खंडणी उकळल्याचे समोर आले.
सरोदे हा चेंबूरचा रहिवासी आहे. टीव्ही मालिका, चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी देतो, असे सांगून तो महिलांचा विश्वास संपादन करत असे. चित्रपटात काम करता येईल, या आशेने मोठ्या संख्येने तरुणी त्याच्या संपर्कात आल्या होत्या. त्याने तो हिंदी चित्रपटसृष्टीत कास्टिंग डायरेक्टर असल्याचे सांगितले होते. सोशल मीडियावरही त्याने तशाच प्रकारे स्वत:चे प्रोफाइल तयार केले होते.
हिंदी मालिकेतील एक अभिनेत्रीही त्याच्या जाळ्यात अडकली. त्याने तिच्या फोटोंचा वापर करत एका अॅपद्वारे ते मॉर्फ केले. अशा प्रकारे फोटोंचा तयार केलेला अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून १ लाखाची खंडणी मागितली. अखेर तिने वर्सोवा पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ९ नेही तपास सुरू केला. मात्र तोपर्यंत तो पसार झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली पथकाने त्याचा शोध सुरू केला. त्याच्या मोबाइल क्रमांकावरून तांत्रिक माहिती मिळवली.
दरम्यान, हाती लागलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये तो कैद झाला होता. त्यात तो एका महिलेकडून पैसे घेताना दिसला. या माहितीच्या आधारे तपासाअंती पोलिसांनी चेंबूरमधून त्याला अटक केली. तपासात सरोदेने दोन अभिनेत्रींसह आठ महिलांना अशा प्रकारे खंडणीसाठी धमकावल्याची कबुली दिली. त्यानुसार गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
बॉम्बची अफवा पसरविल्याप्रकरणी गुन्हा
गुन्हे शाखेने अटक केलेल्या सरोदेविरुद्ध बॉम्बची अफवा पसरवल्याबद्दल यापूर्वी बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.