भारत जोडो यात्रेवेळी खलिस्तानवाद्यांच्या संशयास्पद हालचाली; मुंबई पोलिसांकडून माहिती देण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 05:57 AM2023-01-25T05:57:25+5:302023-01-25T05:57:50+5:30
भारत जोडो यात्रेवर दहशतवादाचे सावट पडल्याचे सांगण्यात येते.
आशिष सिंह
मुंबई :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असतानाच मुंबई शहरातील दोन भागांमध्ये खलिस्तान चळवळीशी संबंधित समर्थकांच्या संशयास्पद हालचाली सुरू होत्या, असे तपास यंत्रणांना आढळले आहे. या प्रकरणी काही जणांचा शोध सुरू आहे. या हालचालींमुळे भारत जोडो यात्रेवर दहशतवादाचे सावट पडल्याचे सांगण्यात येते.
११ जानेवारी २०२३ रोजी राहुल गांधी हे पंजाबमध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात पोहोचले तेव्हा त्या दरम्यान खलिस्तानवादी फुटीर नेते आणि दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने ‘रक्ताच्या बदल्यात रक्त’ अशी घोषणा देत शिखांविरोधातील दंगलीत झालेल्या हत्यांचा सूड घेण्याची भाषा केली होती. त्यानंतर चेंबूर भागातील गुरुद्वाराबाहेर आणि वडाळा येथील भक्ती पार्क परिसरात खलिस्तानी समर्थकांच्या एका गटाने राहुल गांधी यांच्याविरोधात पोस्टर लावत धमक्या देत तुरुंगात बंदिस्त असलेल्या खलिस्तानी समर्थकांना सोडून देण्याची मागणी केली. त्यानंतर हे पोस्टर तेथून हटवण्यात आले. हे पोस्टर कोणी लावले होते, याचा शोध सुरू असल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात येते.
खलिस्तानवादी चळवळीशी संबंधित या समर्थकांचा सध्या मुंबईसह नांदेड परिसरात शोध सुरू आहे. दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू शीख फॉर जस्टीस मूव्हमेंटचा संस्थापक आहे. आयएसआयच्या इशाऱ्यावरून तो विदेशातून संशयास्पद कारवाया करत असतो. त्याचसंदर्भात मुंबईतील खलिस्तानवाद्यांच्या हालचालींवर तपास यंत्रणांची नजर आहे.
चौकशीत गुरूपतवंत सिंग पन्नूला मदत करणाऱ्या पंजाबातील आणखी एका संघटनेची माहिती मिळाली आहे. २०२२ साली देशविरोधी कारवायांमध्ये हात असल्याच्या संशयावरून माहिती घेतली जात असतानाच भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या या हालचाली उघडकीस आल्या.
मुंबईचे पोलिस उपायुक्त हेमराज सिंह राजपूत यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार देत शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगितले.