मुंबई : कुवेतमधील एक बोट मुंबईची सागरी सुरक्षा भेदून थेट गेट वे ऑफ इंडियाला पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. चौकशीत, मालक त्रास देत असल्याने कामगार मालकाच्या बोटीसह मुंबईत धडकले. मात्र, या घटनेनंतर सागरी सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२६/११ ला दहशतवादी समुद्रमार्गेच मुंबईत धडकले होते. मंगळवारी संशयास्पद बोट गेट वे ऑफ इंडियाजवळ पोहोचली. या बोटीवर तीन जण होते. ही बोट कुवेतमधील असल्याचे लक्षात येताच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बोटीवरील तिघांना ताब्यात घेत त्यांची आणि बोटीची तपासणी केली. मात्र संशयास्पद काही आढळले नाही. बोटीवर सापडलेले तिघेही कन्याकुमारी येथील रहिवासी आहेत. ते दोन वर्षांपूर्वी कुवेत येथे बोटीवर कामाला गेले होते. मात्र तेथील मालक त्यांना ना वेतन देत होता, ना जेवण. त्यांना मारहाणही करत होता. तसेच, त्या व्यक्तीने पासपोर्टसुद्धा काढून घेतले असल्याने भारतात परत येणे कठीण झाले होते. त्यामुळे या तिघांनी संधी साधून मालकाची बोट घेत मुंबई गाठल्याचा दावा पोलिसांकडे केला आहे. मात्र पोलिस या तिघांकडे कसून चौकशी करून त्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करत आहेत.
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह :
२६/११च्या हल्ल्यातील पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि स्थानिक पोलिस अशी सुरक्षा भेदून सागरी मार्गाने मुंबईत प्रवेश केला होता. त्यानंतर मुंबईची सागरी सुरक्षा भक्कम करण्यात आल्याचा दावा शासन आणि यंत्रणांकडून केला जात आहे.