लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: ‘एम एस धोनी : दि अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात सुशांतसिंग राजपूतसोबत काम करणारा अभिनेता संदीप नाहर याचा सोमवारी गोरेगाव येथील घरात मृतदेह सापडला. त्याने आत्महत्या केली की यामागे काही घातपात आहे, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.
मृत्यूपूर्वी त्याने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, यात तो खासगी आणि व्यावसायिक जीवनात नैराश्येत असल्याचे दिसत आहे. गोरेगाव पश्चिमच्या विबग्योर शाळेजवळील इमारतीत संदीप राहत होता. संदीपने मृत्यूपूर्वी फेसबुकवर शेअर केलेल्या नोटमध्ये गेल्या दोन वर्षांत त्यांचे आयुष्य संपूर्णपणे बदलले आहे, असे म्हणत कौटुंबिक वादाबाबत भाष्य केले आहे. तसेच बॉलिवूडबाबतही निराशा व्यक्त केली असून ‘बस दिल नही अब जिने का’ या शब्दात नैराश्य व्यक्त केले आहे. याबाबत गोरेगाव पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत संदीप याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. दरम्यान, पोलीस त्यांच्या नातेवाईक तसेच मित्रांकडे चौकशी करत आहेत.