मुंबई : चेंबूरमधील सिंधी सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये दोन वृद्ध बहिणींचा मृतदेह गुरुवारी आढळून आला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून आत्महत्या केली असावी किंवा नैसर्गिक मृत्यू आला असल्याची शक्यता चेंबूर पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मोहिनी जेटवाणी (वय ७५) व बसंती जेटवाणी (७०) अशी त्यांची नावे असून सुरुवातीला हत्या झाल्याचे वृत्त पसरल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र फ्लॅटच्या दाराला आतून कडी घालण्यात आली होती व सर्व वस्तू जशाच्या तशा आढळून आल्याने खून नसल्याचे स्पष्ट झाले. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. २, ३ दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आल्यानंतर त्याचा उलगडा होईल, असे परिमंडळ-६चे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. सिंधी सोसायटीतील त्रिशूल इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटवर जेटवाणी भगिनी राहत होत्या. त्या दोघीही अविवाहित होत्या. त्यांच्यासोबत राहणाऱ्या भावाचे वर्षभरापूर्वी वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. तेव्हापासून दोघी राहत होत्या. त्यांच्याकडे कोणीही येत नसल्याने नातेवाइकांबाबतही शेजाऱ्यांना काही माहिती नव्हती. बसंती यांची प्रकृती काही महिन्यांपासून बिघडली होती त्यातच दोन महिन्यांपूर्वी त्या बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या होत्या. चेंबूर पोलिसांनी पंचनामा करत दोन्ही मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दोन्ही महिलांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमा पोलिसांना आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे या महिलांचा मृत्यू हा नैसर्गिक असू शकतो अथवा त्यांनी काही विषारी द्रव्य घेउन आत्महत्या केली असल्याची शक्यता आहे. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे उपायुक्त उमाप सांगितले. (प्रतिनिधी)
चेंबूरमध्ये वृद्ध बहिणींचा संशयास्पद मृत्यू
By admin | Published: June 03, 2016 3:13 AM