Join us

मालवणी पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू

By admin | Published: April 03, 2015 3:13 AM

जुहू परिसरात लिंबू-मिरची विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या हरी बिरबल चौहान (५०) यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आज सकाळी मालवणी पोलीस ठाण्याच्या कोठडीत सापडला.

मुंबई : जुहू परिसरात लिंबू-मिरची विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या हरी बिरबल चौहान (५०) यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आज सकाळी मालवणी पोलीस ठाण्याच्या कोठडीत सापडला. एका प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी बुधवारी रात्री मालवणीमधील अंबुजवाडीतील घरातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांनी गळफास घेतल्याचे पोलीस सांगत असले तरी कोठडीतील मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप चौहानच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास आता गुन्हे शाखा करणार आहे. चौहान यांचा जावई शोएब शेख ऊर्फस्वप्निल काळे ऊर्फ राजू (२३) याचा मालवणी परिसरात मोबाइल विक्रीचा व्यवसाय आहे. चौकशीसाठी मंगळवारी रात्री मालवणी पोलिसांनी काळेला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. दोन दिवस तो पोलिसांच्याच ताब्यात होता. दोन दिवसांनंतर बुधवारी रात्री मालवणी पोलिसांनी चौहान यांना चौकशीच्या नावाखाली मारत मारत पोलीस ठाण्यात नेले. त्या रात्री चौहान घरी परतलेच नाहीत. ‘गुरुवारी पहाटे सहा वाजता माझी पत्नी पारो त्यांना चहा देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली. तेव्हा वडिलांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत तिला दिसला. तेव्हा तिने आरडाओरड करत झोपलेल्या पोलिसांना जागे केले, असे चौहान यांचा मुलगा अमित याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. चौहान यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांना सांगितले. मात्र पोलिसांच्या मारहाणीत चौहान यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या घरच्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी याप्रकरणी आत्महत्येची नोंद केली असली, तरी चौहान यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी या प्रकरणाचा तपास मुंबई क्राइम ब्रांचच्या कक्ष अकराकडे वर्ग करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच या प्रकरणातील तथ्य बाहेर येईल. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन परिमंडळ अकराचे पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांनी दिले.