प्रियकराने उघडला दरवाजा, फ्लॅटची तिसरी चावी गायब; महिला पायलटच्या मृत्यू प्रकरणात कुटुंबियांना वेगळा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 02:35 PM2024-11-28T14:35:52+5:302024-11-28T14:42:38+5:30

मुंबईत महिला वैमानिकाच्या मृत्यूनंतर खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

Suspicious story of the death of female pilot srushti tuli in Mumbai | प्रियकराने उघडला दरवाजा, फ्लॅटची तिसरी चावी गायब; महिला पायलटच्या मृत्यू प्रकरणात कुटुंबियांना वेगळा संशय

प्रियकराने उघडला दरवाजा, फ्लॅटची तिसरी चावी गायब; महिला पायलटच्या मृत्यू प्रकरणात कुटुंबियांना वेगळा संशय

Mumbai Crime : उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील सृष्टी तुली या महिला वैमानिकाचा मृतदेह मुंबईतल्या घरात संशयास्पदरित्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन अहवालानुसार गळा आवळला गेल्याने सृष्टीचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. मृताच्या कुटुंबीयांनी सांगितले की, पोलीस चौकशीत तिच्या प्रियकराने सांगितले की फ्लॅटमधील चार्जिंग केबलला गळफास लावून सृष्टीने आत्महत्या केली होती. पवई पोलिसांनी याप्रकरणी प्रियकर आदित्य पंडितला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. मात्र कुटुंबीयांना प्रियकराने सृष्टीची हत्या केल्याचा संशय आहे. कुटुंबियांना प्रियकरावर हिंसाचार आणि अत्याचाराचा आरोपही केला आहे.

गोरखपूरच्या शिवपुरी कॉलनी येथे राहणारी सृष्टी एअर इंडियामध्ये पायलट होती. सृष्टीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव देखील करण्यात आला होता. एका कार्यक्रमादरम्यान नॉनव्हेज खाण्यावरून सृष्टी आणि प्रियकर आदित्य पंडित यांच्यात वाद झाला. आदित्यने सृष्टीला सर्वांसमोर अपमानित केले होते, त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या तुटली होती. यानंतर तिचा मृतदेह सापडला होता. सृष्टी तुलीचे काका विवेक तुली यांनी सांगितले की, त्यांची भाची २५ वर्षीय सृष्टी अंधेरी येथे राहत होती. रविवारी रात्री मुलीने दिल्लीहून फोन केला असता तिने सृष्टीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सृष्टीच्या नंबरवर फोन केल्यानंतर उर्वी नावाच्या मुलीने तिचा फोन घेतला होता.

रविवारी रात्री ड्युटी संपवून सृष्टी साडेबारा वाजता तिच्या फ्लॅटवर पोहोचली होती. यानंतर तिने आदित्य पंडितसोबत जेवणे केले. घरी पोहोचल्यानंतर तिने गोरखपूरमध्ये आईशी फोनवरुन बोलणं केलं होतं. सृष्टी जून २०२३ मध्ये एअर इंडियामध्ये रुजू झाली. सृष्टीचे वडील मेजर नरेंद्र कुमार हे भारतीय लष्करात होते. ते १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झाले होते. सृष्टीच्या बाबांना दोनदा पदकाने गौरविण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "मी दिल्लीतील माझ्या घरी जाण्यासाठी रात्री १:२९ वाजता सृष्टीच्या फ्लॅटमधून बाहेर पडलो होतो. यानंतर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सृष्टीने मला फोन करून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. तोपर्यंत मी मुंबईपासून ३५ किलोमीटर दूर गेलो होतो. यानंतर मी परत आलो आणि माझ्या एका मैत्रिणीला फोन करून दुसरी बनवली आणि सोमवारी पहाटे पाच वाजता कुलूप उघडले. मी आत पाहिले तर सृष्टी चार्जिंग केबलला लटकत होती. तिला खाली उतरवून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले," असं आदित्यने सांगितले.

सृष्टीचा काका विवेक तुली यांनी प्रियकर आदित्यवर गंभीर आरोप केले आहेत. "जेव्हा सृष्टीने आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते, तेव्हा आदित्यने पोलिसांना का कळवले नाही? यानंतर आत्महत्येच्या ठिकाणाशीही छेडछाड करण्यात आली. गॅरेजमध्ये चार्जिंग केबल सापडली. सृष्टीच्या फ्लॅटच्या तीन चाव्या होत्या. दोन चाव्या तिच्याकडे होत्या आणि एक चावी तिच्या रूममेटकडे होती. मात्र हा सगळा प्रकार घडला त्यावेळी ती कामावर होती. पोलिसांना सृष्टीची दुसरी चावी सापडलेली नाही. घराचा दरवाजा उघडला त्यावेळी आदित्य पंडित सोबत त्याची मैत्रीण होती की तिसरी कोणी व्यक्ती होती हे सांगता येत नाही," असं विवेक तुली यांनी म्हटलं.

चार्जिंग केबलच्या साह्याने पंख्याला गळफास लावून कोणी आत्महत्या कशी करू शकते, असा सवाल सृष्टीच्या काकांनी केला आहे. "घरात काहीही विखुरलेले नाही. टेबलही आहे त्या स्थितीत आहे. त्यांच्यात काय झाले याबद्दल काहीही सांगता येणार नाही. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपीचे जबाबही वेगळे आहेत," असं सृष्टीच्या काकांनी म्हटलं. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्यायिक संहितेच्या कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनामध्ये फाशी घेतल्याने मृत्यू झाल्याचे उघड झाले असले तरी विसेरा अहवालातून सर्व काही स्पष्ट होणार आहे.

सृष्टीचे काका विवेक तुली यांनी सांगितले की, सृष्टीच्या बँक खात्यातून मागील एक महिन्याचे रेकॉर्ड तपासल्यानंतर आदित्यच्या खात्यावर ६५ हजार रुपये पाठवण्यात आले आहेत. "मुलीला न्याय न मिळाल्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांना यात लक्ष घालण्याची विनंती करणार आहे. माझी देवावर पूर्ण श्रद्धा आहे. माझी भाची आत्महत्या करू शकत नाही. तिच्या खोलीतून पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. ती पायलट झाली होती आणि आदित्य पंडित पायलटची परीक्षा पास करू शकला नाही. मला आदित्यबद्दल शंका आहे. मुंबई पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा आहे," असेही सृष्टीच्या काकांनी सांगितले.

Web Title: Suspicious story of the death of female pilot srushti tuli in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.