मुंबईत नाइट पार्टीत सापडले सुरेश रैना, सुझान खान; ड्रॅगनफ्लाय पबवर पोलिसांचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 06:22 AM2020-12-23T06:22:52+5:302020-12-23T06:24:19+5:30
Sussanne Khan, Suresh Raina booked after raid on Mumbai nightclub : भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, अभिनेता हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खान तसेच बॉलीवूड सेलिब्रिटींसह ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील ड्रॅगनफ्लाय पबवर मुंबई पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. यावेळी तेथे हजर असलेल्या भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, अभिनेता हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खान तसेच बॉलीवूड सेलिब्रिटींसह ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राज्यात मंगळवारी रात्रीपासून ५ जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत नाइट कर्फ्यू जाहीर करण्यात आला असताना ड्रॅगनफ्लाय पब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती मिळताच, सहार पोलिसांकडून मध्यरात्री २.३० वाजता ही कारवाई केली. कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याला दुजोरा दिला. कोरोनासंबंधित नियमांचे पालन न करणे व वेळमर्यादेनंतरही पब सुरू ठेवल्याने कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली, पंजाबमधून १९ जण येथे आले होते. ताब्यात घेतलेल्यांना नोटीस देऊन सोडून दिले आहे. कारवाईदरम्यान काही जण मागील दरवाजातून पळून गेल्याची शक्यता आहे. मुंबईबाहेरून आलेल्यांना मंगळवारी सकाळच्या फ्लाइट्सने परत पाठविण्यात आले आहे.
मुंबईतील नियमांबाबत कल्पना नव्हती
- सुरेश रैना मुंबईत शूटिंगसाठी आला हाेता. रात्री उशीर झाला. सकाळी दिल्लीला परत जायचे होते.
- जाण्यापूर्वी त्याच्या मित्राने रात्रीच्या जेवणासाठी आग्रह केल्याने ते त्या पबमध्ये गेले. त्यांना स्थानिक नियमांबाबत कल्पना नव्हती.
- याबाबत समजताच त्याने नकळत हातून घडलेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ताे नेहमीच कायद्याचे पालन करताे आणि पुढेही करत राहणार असल्याचे स्पष्टीकरण रैनाच्या व्यवस्थापन टीमकडून देण्यात आले.
‘पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग!’
सहार पोलिसांकडून मध्यरात्री ही कारवाई केली. या घटनेचा संदर्भ देत मुंबई पोलिसांनी ‘पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग!’ असे ट्विट केले आहे. या ट्विटवर सोशल मीडियात बरीच चर्चा रंगली होती.