साहित्य निर्मितीमुळे शाश्वत समाज शक्य
By Admin | Published: May 23, 2017 03:44 AM2017-05-23T03:44:21+5:302017-05-23T03:44:21+5:30
रुढी-परंपरेच्या युगात समाज बदलणाऱ्या कवितांची निर्मिती केशवसुतांनी केली. आधुनिकतेकडे जाताना साहित्यिकांची गरज असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रुढी-परंपरेच्या युगात समाज बदलणाऱ्या कवितांची निर्मिती केशवसुतांनी केली. आधुनिकतेकडे जाताना साहित्यिकांची गरज असते. किंबहुना साहित्य निर्मितीमुळेच समाज शाश्वत होतो, असा विश्वास रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला. दादर-सावंतवाडी राज्यराणी एक्स्प्रेसच्या तुतारी एक्स्प्रेस या नामकरण कार्यक्रमात ते बोलत होते. केशवसुतांच्या कवितेचे नाव म्हणजे रेल्वेचा सन्मान असल्याची भावना प्रभूंनी या वेळी व्यक्त केली.
दादर येथील कोहिनूर सभागृहात सोमवारी पार पडलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री अनंत गीते, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, कोकण मराठी साहित्य परिषदेचे महेश केळुसकर आणि कोकण रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता उपस्थित होते.
कोकण मराठी साहित्य परिषदेने केलेल्या मागणीनुसार पहिली मागणी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी पूर्ण केली असून पोस्टल तिकिटाची मागणी अन्य केंद्रीय मंत्री पूर्ण करतील, असा विश्वास गीते यांनी व्यक्त केला.
केशवसुत मराठीच असल्याने महाराष्ट्राच्या बाहेर त्यांची साहित्यनिर्मिती पोहोचली नाही, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केली. या वेळी उपस्थितांसह मान्यवरांनीही केशवसुतांच्या कवितांचे वाचन केले.
ट्रेन क्रमांक ११००३/११००४ दादर-सावंतवाडी राज्यराणीच्या प्रवाशांना नामकरणाची माहिती मिळावी यासाठी सोमवारी प्रवास करणाऱ्या ‘तुतारी’ एक्स्प्रेसमध्ये केशवसुतांची ‘तुतारी’ या कवितेचे पोस्टर वाटप करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेच्या वतीने देण्यात आली.
...........................................
रेल्वेच्या मंचावर साहित्यकारण, शिक्षण आणि राजकारण अशा मान्यवरांचे एकत्रिकरण होत आहे, हे कौतुकास्पद आहे. रविंद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीनंतर केशवसुतांची तुतारी देशात गाजेल. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना कोमसापच्या वतीने दोन मागण्या करण्यात आल्या होत्या. तब्बल १० वर्षांनंतर पहिली मागणी पूर्ण झाली आहे. केशवसुत मराठीतच असल्याने महाराष्ट्राच्या बाहेर त्यांची साहित्यनिर्मिती पोहचली नाही ही खंत आहे.
- मधू मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक
...........................................