सागर नेवरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहिसर, पोईसर, ओशिवरा आणि मिठी या चारही नद्यांच्या संवर्धनासाठी ‘रिव्हर मार्च’ने ‘स्वच्छ नदी अभियान’ हाती घेतले असले, तरी प्रत्यक्षात दहिसर नदीलगतच्या तबेलाधारकांकडून कुरघोड्या सुरूच आहेत. येथील तबेल्यातून दहिसर नदीच्या पात्रात कचरा टाकला जात असून, नदी प्रदूषित केली जात आहे.‘रिव्हर मार्च’कडून मिळालेल्या माहितीनुसार, नदीपात्राला लागून १३ तबेले आहेत. तबेल्यात हजार जनावरे आहेत. बोरीवली येथील नॅशनल पार्कशेजारी श्रीकृष्णा कॉम्प्लेक्स इमारतीच्या जवळून तबेल्यातील जनावरांची विष्ठा वाहून जाते. त्यामुळे इमारतीच्या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथील नागरिकांना दुर्गंधी आणि मृत जनावरांचा त्रास होत असून, नदीही प्रदूषित होत आहे. श्रीकृष्णा कॉम्प्लेक्स इमारतीच्या परिसरातून जनावरांची विष्ठा वाहत असून, यावर उपाय योजले जातील, असे ‘रिव्हर मार्च’चे म्हणणे आहे. दरम्यान, तबेल्यामध्ये बायोगॅस प्रकल्प, विष्ठा आणि कचरा दुसºया ठिकाणी वाहून नेणे ही प्रक्रिया खर्चिक आणि मेहनतीची असल्याने, सोपा उपाय म्हणून नदीपात्रात कचरा टाकला जातो. हे गैरप्रकार थांबण्यासाठी दहिसर नदीपात्रामध्ये महापालिकेकडून गेट लावण्यात आला होता. गेटमधून विष्ठा आणि मृत जनावरे नदीपात्रात जात नव्हती, परंतु येथील गेट तोडण्यात आला. परिणामी, समस्या सुटण्याऐवजी वाढतच आहे.तबेला मालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी नोटीस दिली आहे. पालिका येथे जाळी बसविते. मात्र, जाळी चोरीला जाते. तबेला स्थलांतरित करण्याबाबत बैठक घेण्यात आली आहे- अतुल राव, सहायक आयुक्त, आर/एन विभागदुर्गंधीमुळे आजार पसरत आहेत. नदीपात्रात शेण, गवत आणि मृत जनावरे टाकू नयेत, असे आमचे म्हणणे आहे.- पंकज त्रिवेदी, स्थानिक रहिवासीमहापालिका कायमस्वरूपी उपाययोजना करत नाही. नागरिकांचा दबाव येतो, तेव्हा महापालिका तात्पुरती उपाययोजना करते. कोणालाही नदी प्रदूषित करण्याचा अधिकार नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रकरणी कारवाई करत नाही.- गोपाल झवेरी,सदस्य, रिव्हर मार्चनदी प्रदूषित व्हावी, असे तबेला मालकांचे म्हणणे नाही. ते नदी प्रदूषणाच्या विरोधात आहेत. मात्र, त्यांना स्थलांतरणासाठी आवश्यक मदत केली पाहिजे. या प्रकरणी महापालिका उदासीन आहे. परिणामी, यावर तोडगा काढताना दोन्ही बाजूंनी विचार करण्याची गरज आहे. नॅशनल पार्क आणि दहिसर नदीचे अस्तित्व राहिले नाही, तर नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊ शकते.- विद्यार्थी सिंह, स्थानिक नगरसेवक
दहिसर नदीच्या ‘प्रदूषणा’चे ग्रहण सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 2:19 AM