राज चिंचणकर / मुंबईअभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे आकस्मिक निधन झाले तेव्हा ‘सुयोग’ नाट्यसंस्थेच्या ‘तीन पायांची शर्यत’ या नाटकाच्या तालमीत त्या अडकल्या होत्या. या नाटकात त्या एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होत्या. मात्र नियतीला हे होणे मंजूर नव्हते. अश्विनीच्या अचानक ‘एक्झिट’ने ‘सुयोग’च्या संदेश भट यांच्यासमोर मोठेच प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. मात्र आता यातून त्यांची सुटका झाली आहे. या नाटकात जी भूमिका अश्विनी साकारणार होती, त्या भूमिकेसाठी शर्वरी लोहकरे या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे.‘तीन पायांची शर्यत’ या नाटकाची तालीम अंतिम टप्प्यात आली आहे. अश्विनीने कायमची एक्झिट घेतली आणि नाटकाचे पुढे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला. सुयोगचे सर्वेसर्वा सुधीर भट यांच्या पश्चात या नाट्यसंस्थेची धुरा पेलणारा त्यांचा मुलगा संदेश याने त्यावर तोडगा काढत शर्वरीला या भूमिकेसाठी विचारणा केली आणि शर्वरीनेही त्यास होकार दिला. साहजिकच, १९ नोव्हेंबर रोजी रंगभूमीवर येत असलेल्या सुयोगच्या या नाटकात आता शर्वरी लोहकरेची वर्णी लागली आहे. विजय केंकरे हे या नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत.
‘सुयोग’चा शो मस्ट गो आॅन...!
By admin | Published: November 15, 2016 4:58 AM