मुंबई : बोरीवलीच्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळा (एसव्हीआयएस) संघाने बी. खिचाडिया उपनगर शालेय क्रिकेट स्पर्धेचे दिमाखदार विजेतेपद पटकावताना बलाढ्य रिझवी स्प्रिंगफिल्डला ६० धावांनी धक्का दिला. मुंबई शालेय क्रिकेटमधील जवळपास प्रत्येक स्पर्धांमध्ये वर्चस्व राखणाऱ्या रिझवीच्या सत्तेला हादरा दिल्याने एसव्हीआयएस संघाने मुंबई क्रिकेटचे लक्ष वेधले आहे.खार जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात कर्णधार सुवेद पारकरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या एसव्हीआयएसने जबरदस्त सांघिक खेळ केला. सुवेदने ‘कॅप्टन्स इनिंग’ करताना शानदार ७१ धावांची खेळी केल्यानंतर गोलंदाजीतही ४ बळी घेत संघाच्या जेतेपदामध्ये निर्णायक भूमिका बजावली. सुवेद (७१), मनन झताकिया (६१) आणि गौतम वाघेला (नाबाद ६०) यांच्या जोरावर एसव्हीआयएसने ४५ षटकात ५ बाद २८५ धावांची आव्हानात्मक मजल मारली. श्रेयश बोगर व आदित्य पांड्ये यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.बलाढ्य रिझवीची फलंदाजी ३८.३ षटकात केवळ २२५ धावांमध्ये कोसळली. कर्णधार सुवेदने गोलंदाजीतही चमक दाखवताना ६२ धावांत ४ बळी घेत रिझवीच्या फलंदाजीला खिंडार पाडले. राहुल केसरीनेही ८० धावांमध्ये ४ बळी घेत रिझवीच्या आव्हानातली हवा काढली. तसेच गौतमने २ बळी घेत या दोघांना चांगली साथ दिली. (क्रीडा प्रतिनिधी)स्वामी विवेकानंद (बोरीवली) : ४५ षटकात ५ बाद २८५ धावा (सुवेद पारकर ७१, मनन झताकिया ६१, गौतम वाघेला नाबाद ६०; आदित्य पांड्या २/७२, श्रेयश बोगर २/९१) वि. वि. रिझवी स्प्रिंगफिल्ड (वांद्रे) : ३८.३ षटकात सर्वबाद २२५ धावा. (शोएब सिद्दिकी ६२, यश साळुंखे ४९; सुवेद पारकर ४/६२, राहुल केसरी ४/८०)
एसव्हीआयएसचे शानदार जेतेपद
By admin | Published: February 08, 2017 4:54 AM