मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३८व्या जयंतीनिमित्त दादरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या पुतळ्याच्या चरणी एक वृक्ष ठेवून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
सर्वप्रथम सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करण्यात आले. त्यांनतर ‘एक वृक्ष क्रांतिकारक सैनिकांसाठी’ या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी सीमा खोत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडणार आहे. ५ जून रोजी द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचा ४८ वा स्मृतिदिन व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, सावरकर स्मारक समिती, राष्ट्र सेविका समिती, राष्ट्राभिमानी सेवा समिती व ज्ञानदा प्रबोधन संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्र सेविका समितीच्या आदिवासी पाड्यात राहणाऱ्या मुलींनी रचलेल्या देशभक्तिपर गाण्यांचा कार्यक्रम घेण्यात आला. वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना सावरकर यांचे ‘हिंदुत्व’ हे पुस्तक भेट देण्यात आले.