'भाजपा ३ जणांच्या माध्यमातून राज्य सरकार उलथवण्याचा प्रयत्न करतेय'; राजू शेट्टींचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 10:38 AM2022-06-24T10:38:18+5:302022-06-24T10:45:05+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे.
मुंबई- भाजपसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट संकेत शिवसेनेचे बंडखोर नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले. त्यामुळे भाजपा-शिंदे युतीचे सरकार राज्यात स्थापन करण्याच्या हालचाली एक-दोन दिवसात गतिमान होतील, असे मानले जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतील हॉटेलमध्ये गुरुवारी समर्थक आमदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समर्थकांना आश्वस्त करताना अप्रत्यक्षपणे या सर्व राजकीय खेळीमागे भारतीय जनता पक्ष असल्याचे सूचित केले. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनीही बंडखोरीमागे भाजपाच असल्याचा दावा केला. शरद पवारांच्या या विधानानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे.
भाजपाकडं असलेल्या ईडी, आयकर विभाग आणि सीबीआय या तीन अतिशय प्रभावी कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच महाराष्ट्रातलं सरकार पाडण्याच्या उलथापालथी होत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. भाजपा ज्या पद्धतीनं पाशवी वृत्ती दाखवून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्रमधील महाविकास आघाडीचे सरकार पाडतेय, हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक असल्याचं राजू शेट्टी म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेकडून १२ आमदारांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निलंबन करण्याचा अधिकारच नाही. कारण आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे आणि ते संख्याबळ सिद्ध करुन दाखवण्याची आमची ताकद आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. बैठकीला उपस्थित राहिलो नाही, म्हणून तुम्ही आमदारकी रद्द करण्याची मागणी करताय..असं कधी होतं का?, बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे म्हणून आमदारांचं निलंबन केलं जावं, असं देशात कोणतंही उदाहरण नाही. तसेच संख्याबळ सिद्ध करुन दाखवण्याची आमची ताकद आहे, असा दावा एकनाथ शिंदेंनी केला.
तुम्हाला उद्धव ठाकरेंनीच गुवाहाटीला पाठवलंय का?
एकनाथ शिंदेंच्या बंडामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच हात असल्याचे सांगण्यात येत हे. सध्या जे काही सुरु आहे, ती शिवसेनेचीच खेळी आहे. उद्धव ठाकरे यांनीत एकनाथ शिंदेंसह इतर आमदारांना गुवाहटीला पाठवल्याची चर्चाही रंगली आहे, असा सवाल माध्यमांनी विचारला. त्यावर मला या चर्चांबाबत काही माहिती नाही, असं एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं.