Join us  

राजू शेट्टींचा महाविकास आघाडी सोडण्याचा विचार; मात्र त्यांच्याच एकमेव आमदाराने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 1:34 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना इशारा दिला आहे.

मुंबई- महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सामुदायिक निर्णय होता. येत्या ५ एप्रिलला राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल, अशा शब्दांत राजू शेट्टीं यांनी महाविकास आघाडी सोडण्याबाबत सूचक इशारा दिला आहे.

पूरग्रस्तांचे प्रश्न, दोन टप्प्यांमधील एफआरपी, वीज कपात, वसुली अशा विविध मागण्यांसाठी आम्ही लढत आहोत. मात्र सत्तेत असूनही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत, असं सांगत राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर नाराजी दर्शवली आहे. 

राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सोडण्याचा इशारा दिला असला तरी त्यांच्या पक्षाचे एकमेव असलेले आमदार देवेंद्र भुयार काय निर्णय घेणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ५ एप्रिलच्या बैठकीनंतर मी माझा निर्णय ठरवेल, असं भुयार यांनी म्हटलं आहे. 

भुयार म्हणाले की,  कुठल्या विषयावर संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार आहे, हा एक सवाल आहे. जे प्रश्न भाजपनं सोडवले नाहीत ते महाविकास आघाडी सरकारनं सोडवले आहेत. वीजेचा प्रश्न सुटणे कठिण आहे पण शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला भाव असे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत, असं भुयार यांनी सांगितलं. 

महाविकास आघाडीशी स्वाभिमानीचं कोणत्या कारणामुळं बिनसलं याबाबत काही कल्पना नाही. मात्र मला विश्वासात घेतलं तर आपण आपला निर्णय घेऊ, आणि मला विश्वासात घेतलं नाही, तर त्यांच्याशिवाय राहू, असा इशाराही भुयार यांनी राजू शेट्टी यांना दिला आहे. त्यामुळे ५ एप्रिलच्या बैठकीत नेमकं काय होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून माजी खासदार राजू शेट्टी यांनी महावितरण विरोधात कोल्हापुरात आंदोलन छेडले होते. शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज रात्रीची न देता दिवसाची मिळावी. तसेच शेतकऱ्यांच्या वीज तोडणी थांबवावी या मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन केलं होतं.  आंदोलनातही त्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात टीका केली होती. तसेच पूर मदत निधी शेतकऱ्यांना वेळेत मिळावी या मागणीसाठी राज्य सरकार विरोधात कोल्हापुरात मोठं आंदोलन केलं होतं.

टॅग्स :राजू शेट्टीकोल्हापूरमहाराष्ट्र विकास आघाडी