मुंबई : आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी सचिन तेंडुलकरला केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर पोस्टरबाजी करत हा प्रश्न विचारला आहे. तसेच, या पोस्टरबाजीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी पाठिंबा दर्शवत ट्विट केले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकरने ट्विट करत अप्रत्यक्षपणे रिहानावर टीका केली आणि सरकारचे समर्थन केल्याचे समोर आल्याने, सचिनबद्दल विविध प्रतिक्रिया समोर आहेत. सचिन तेंडुलकरने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यापूर्वी भूमिका का घेतली नाही, असा सवाल शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असणाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या ट्विटनंतर विविध शेतकरी संघटनांनी आपला रोष व्यक्त केला आहे. तर काही संघटनांनी तर सचिनला दिलेला भारतरत्न पुरस्कार काढून घेण्याची मागणी केली आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरला विचारला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांची सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर पोस्टरबाजी करत त्याला प्रश्न विचारला आहे.
सचिन तेंडुलकरने काय ट्विट केलं होत?शेतकरी आंदोलनाला पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी पाठिंबा दर्शवत ट्विट केल्यानंतर सचिन तेंडुलकरने ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले होते. "भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. भारतासाठी काय चांगले आहे, हे येथील नागरिकांना कळते आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे", असे ट्विट सचिन तेंडुलकरने केले होते.