मुंबई : राज्य शासनासह महापालिकेतील सफाई कामगारांना हक्काची घरे मोफत देण्याची तरतूद असलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी सफाई कामगारांनी बुधवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री आमदार जयंत पाटील यांनी सफाई कामगारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत ८ दिवसांत चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे सरकारचे श्राद्ध घालण्यासाठी होणारे मुंडण आंदोलन आंदोलकांनी रद्द केले.या वेळी जयंत पाटील म्हणाले की, सफाई कामगारांच्या प्रश्नावर माजी गृह निर्माण राज्य मंत्री सचिन अहिर यांच्यासोबत चर्चा केली आहे. लवकरच अहिर यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाईल. त्यात आंदोलनाचे आयोजक व सफाई कामगारांचे नेते गोविंद परमार यांचा समावेश असेल. नियमानुसार सफाई कामगारांना मोफत घरे मिळालीच पाहिजेत. संबंधित निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अधिकार कक्षेत येतो. त्यामुळे ८ दिवसांत त्यांच्यासोबत बैठक आयोजित करून चर्चेअंती हा प्रश्न मार्गी लावून घेतला जाईल.या वेळी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने गोविंद परमार यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. त्याबाबत परमार यांनी सांगितले की, कामगारांच्या घरांची मागणी रास्त असल्याचे सांगत ती पूर्ण करण्यासाठी सचिवांनी आश्वासित केले आहे. २००९ सालच्या महापालिका भरतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचे सचिवांनी सांगितले. शिवाय लाड पागे समितीमधील लेबर, कामगार आणि ऐवजदार ही नावे बदलून सफाई कामगार हे एकच पद उल्लेखित करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्यासोबत बैठक घेण्याचेही त्यांनी मान्य केले.>...तर जेलभरो!इचलकरंजी येथील सफाई कामगारांना मोफत घरे देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाल्याची माहिती मिळाली आहे. सरकार सकारात्मक असल्याने बुधवारचे मुंडण आंदोलन मागे घेतले आहे. मात्र ८ दिवसांत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लागले नाही, तर नागपूर अधिवेशनात जेलभरो करण्याचा इशारा गोविंद परमार यांनी दिला आहे.
हक्काच्या घरांसाठी सफाई कामगार मैदानात, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, जयंत पाटील यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 2:29 AM