पूजा दामले, मुंबईहवामानात थंडावा नसतानाही स्वाइनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन वर्षांमधील जुलै महिन्याची आकडेवारी पाहाता यंदा त्यात सुमारे ९0 टक्के इतकी वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये स्वाइनचे १७ नवे रुग्ण आढळल्याने जुलै महिन्यातील स्वाइनच्या रुग्णांची संख्या ९२ वर पोहोचली आहे. एच १ एन १ या विषाणूंमुळे स्वाइन फ्लूची लागण होते. स्वाइन हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे अधिक काळजी घेण्याचे आवाहन महापालिका करत आहे. सोमवारी स्वाइनचे ६ नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून मिळाली. जुलै महिन्यात स्वाइनचे पाच बळी गेले असून जानेवारी ते जून दरम्यान स्वाइनमुळे २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यंदा जानेवारी ते मार्चदरम्यान स्वाइनची साथ पसरली होती. या कालावधीत १, ९२५ रुग्ण आढळले होते. स्वाइनची लक्षणे सामान्य फ्लूसारखीच असल्यामुळे अनेकजण उपचार उशिरा सुरू करतात. परिणामी गुंतागुंत वाढत असल्याचे डॉक्टर सांगतात. पावसाळा सुरू झाल्यावर हवामान दमट असते. हवेतील कोरडेपणा कमी होतो. यामुळे जुलै महिन्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी असते. जुलै २०१३ मध्ये स्वाइनचे दोन तर जुलै २०१४ मध्ये स्वाइनचा एकच रुग्ण आढळून आला होता. पण २०१५ मध्ये मात्र २० दिवसांत स्वाइनचे तब्बल ९२ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ही संख्या जास्तच आहे. यामुळे विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिका मुंबईकरांना करत आहे. हवामानातील बदलाने वाढले रुग्णजुलै महिन्यात मुंबईत पावसाला सुरुवात होते. पण यंदा अजूनही मुंबईत पाऊस आलेला नाही. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या जुलै महिन्यात स्वाइनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. याचे एकच एक कारण सांगता येणे शक्य नाही. माझ्या मते, हवामानात झालेले बदल, पाऊस न येणे यामुळेच मुंबईत स्वाइनच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. उर्वरित महाराष्ट्रात स्वाइनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली नाही. संसर्गजन्य आजार असल्यामुळे रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे. - डॉ. ओम श्रीवास्तव, संसर्गजन्य आजारतज्ज्ञस्वाइन फ्लूची लक्षणे ही फ्लूप्रमाणेच असतात. यामुळे रुग्ण अनेकदा दुखणे अंगावर काढतात. मुंबईत स्वाइनचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे डोकेदुखी, सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासून घ्या. स्वाइन हा संसर्गजन्य आजार असल्याने स्वाइनच्या रुग्णाने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. औषधाचा कोर्स पूर्ण केला पाहिजे. - डॉ. मिनी खेत्रपाल, प्रमुख, साथरोग नियंत्रण कक्ष
मुंबईत स्वाइन फोफावतोय
By admin | Published: July 21, 2015 4:09 AM