मुंबई : या जगाचा निर्माता एकच असून, त्याला विविध नावांनी ओळखले जाते. त्यामुळे मनुष्यांनीदेखील धर्म व जातीचे भेद मिटवावेत व एकत्र येत देशाला नवीन उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन स्वामी अग्निवेश यांनी रविवारी मुंबईत केले. भायखळा येथील खिलाफत चळवळीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.एक अल्लाह एक देव ही आपली सर्वात मोठी ताकद यावर एकत्र येऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रेषित मोहम्मद यांनी जगाचा निर्माता एक आहे हा संदेश दिला आहे, त्याचा उल्लेख करत, जगाचा निर्माता एक असताना स्वतंत्र प्रार्थनास्थळे का आहेत, हा प्रश्न सतावतो, असे ते म्हणाले. आपल्यातील मतभेदांचा राजकारणी व्यक्ती लाभ उठवतात. त्यामुळे सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्याचा व त्यांचे हक्क मिळवून देण्याचा लढा मी लढतोय व त्या माध्यमातून गुलामांना आझाद करण्याचा प्रेषित मोहम्मद यांच्या संदेशाचे पालन करत असल्याचे ते म्हणाले. देशातील ५० कोटी असंघटित कामगारांना किमान वेतन मिळावे व त्यांना कामाची हमी मिळणे गरजेचे आहे. खिलाफत समितीने सर्वांना जोडण्याचा जाहीरनामा बनविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गरीब व श्रीमंत दरी मिटविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. खिलाफत समितीने यासाठी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गुलाम याह्या अंजुम होते. यावेळी आमदार अमीन पटेल, माजी मंत्री प्रा.जावेद खान, समितीचे अध्यक्ष सर्फराज आरजू, फरीद खान आदी उपस्थित होते.>जमावबंदी हटविलीअयोध्या खटल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदीचे आदेश दिले होते. ही जमावबंदी रविवारी रात्री हटविण्यात आली. परंतु आणखी काही दिवस सोशल मीडियावर वॉच कायम राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ईद-ए-मिलाद शांततेत पार पडल्याचेही पोलिसांनी सांगितले. अयोध्या खटल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
धर्म-जातीचे भेद मिटवून एकत्र येत देशाला पुढे न्या- स्वामी अग्निवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 5:24 AM