हिंदू धर्माचीच नव्हे, तर अखिल मानव जातीच्या उत्कर्षासाठी ‘विश्वबंधुत्वा’ची शिकवण देणाऱ्या भारतीय ‘मानवधर्माची’ महती आपल्या जाज्वल्य विचारातून साता समुद्रापार पोहोचविणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी मकरसंक्रांतीच्या दिनी कोलकाता येथे झाला. “आगामी पन्नास वर्षे आपली भारतमाता हेच आपले एकमेव उपास्य, श्रद्धास्थान असले पाहिजे, आपल्या देशाच्या सर्व भावी आशा - आकांक्षा तुमच्यावरच अवलंबून आहेत. उठा. लांबच लांब रात्र संपून नवभारताच्या अरुणोदयाचा समय समीप आला आहे. आता प्रगतीची एक विशाल लाट उसळली आहे, तिचा वेग कोणीही रोखू शकत नाही. बंधूंनो, आता आपल्या सगळ्यांनाच खूप कठोर परिश्रम करावे लागतील. खूप खूप झटावे लागेल. आता झोपायला वेळ नाही.” ‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत’ “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका,” असा देशवासीयांना ललकारी देणारा उर्जस्वल स्वर विवेकानंदांचा होता. हे उद्दिष्ट आत्मोद्धाराचे होते.
भारत भ्रमण यात्रेत देशाचे विकलांग स्वरूप पाहून विवेकानंद व्यथित झाले होते. त्यामुळे त्यांचे मिशन हे माणूस घडवणे (मॅन मेकिंग) हे होते. मनुष्य निर्माणातूनच राष्ट्राचे पुनरुत्थान, राष्ट्र निर्माण होऊ शकते यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. आधुनिकता आणि वेदान्ताची आध्यात्मिक बैठक यांचा अपूर्व मिलाफ त्यांच्या शिकवणुकीत होता. विवेकानंदाच्या मते शिक्षणाचा मूलभूत हेतू हा माणूस घडविणे हाच आहे. अद्वैत तत्त्वाप्रमाणे मन, शरीर आणि आत्मा यांचा सुसंवादी विकास म्हणजे माणूस घडविणे होय. ‘मनुष्यात असलेल्या परिपूर्णतेचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण.’ (एज्युकेशन इज द मॅनीफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन द मॅन) तो माणूस घडवायला शिक्षकाने फक्त साहाय्य करायचे आहे. न पचविलेल्या माहितीची मेंदूतील सरमिसळ म्हणजे शिक्षण नव्हे. (एज्युकेशन इज नॉट द अमाउंट ऑफ इन्फर्मेशन दॅट इज पूट इंटू ब्रेन अँड रन्स राइट देअर अनडाय जेस्टेड) तर शिक्षण म्हणजे अशी प्रक्रिया की ज्यामुळे चारित्र्य घडते, मन:शक्ती वाढते, बुद्धिमत्ता धारदार होते आणि ज्यामुळे माणूस स्वत:च्या पायावर उभा राहू शकतो. अशा शिक्षण पद्धतीची युवकांनी कास धरावी.
युवा स्यात् साधु युवाध्यायकः। आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठः॥
अर्थात तरुण हा साधू म्हणजे सरळ, निष्कपटी, निर्मळ आणि खिलाडू वृत्तीचा असला पाहिजे. गर्वाने झुकून न जाता यशाचा तसेच कोणतीही सबब न सांगता अपयशाचा त्याला मोठ्या मनाने स्वीकार करता आला पाहिजे. युवकांना मार्गदर्शन करताना विवेकानंद म्हणतात, तेहतीस कोटी देवदेवतांवर तुमचा विश्वास असेल; पण तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही नास्तिक आहात असे मी मानतो, म्हणून प्रचंड आत्मविश्वास वाढवा, निर्भय व्हा. अमेरिकेतील एका भाषणात विवेकानंद म्हणाले, माझ्या प्रिय मित्रांनो, रोज मैदानावर जा. खेळ खेळा. वासरासारखे हुंदडा. तासनतास मंदिरात बसून घंटा वाजविणाऱ्या, दिवस-दिवसभर ग्रंथांचे पारायण करणाऱ्या युवकांपेक्षा मैदानावर फुटबॉल खेळा. शरीरयष्टी कमावणारा युवक परमेश्वराच्या अधिक निकट जातो. तुमचे स्नायू, मासपेशी या अधिक बळकट झाल्या म्हणजे तुम्हाला गीता व गीतेतील तत्त्वे जास्त चांगल्या प्रकारे कळतील.
युवकांनो, पावित्र्याचे भान ठेवून स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहा, आपल्या भवितव्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा, स्वतःचे भविष्य घडवा, आजपावेतो जे झाले ते होऊन गेले त्याबद्दल खंत करीत बसू नका. ‘वाहिली ती गंगा राहिले ते तीर्थ’ या उक्तीनुसार भविष्याचा वेध घेत मार्गक्रमण करा. भावी काळ तुमच्यापुढे विस्तारलेला आहे. तुमचा प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार, प्रत्येक कृती, तुमच्या गंगाजळीत संचित राहील. ते तुमचे रक्षण करण्यास सदासर्वदा सज्ज आहे.
‘सामर्थ्य तुझ्या बाहूमधले,
तूच जगात दाखवी,
वाट निरामय आयुष्याची
शोधायला हवी।
प्रयोगशाळा रणमैदाने
तारुण्याला ही आव्हाने।।
तेव्हा या समर्पक विचारांची कृती होणे आवश्यक आहे.
विवेकानंद संबोधतात. “युवकांनो, झेप घ्या. दिशा तुम्हाला शरण येतील.” ब्रिटिशांच्या गुलामगिरीत देश असताना विवेकानंद या तरुण योद्धा संन्याशाने एकट्याने सारे जग आपल्या विचाराने जिंकले होते. आजच्या तरुणाला विवेकानंदांचे विचार अंगीकारावे लागतील, कारण विवेकानंद ही केवळ व्यक्ती नसून, ती एक वृत्ती आहे. म्हणून तिची पुनरावृत्ती शक्य आहे. राजयोग, भक्तियोग, कर्मयोग यांचा त्रिवेणी संगम म्हणजे विवेकानंद होय. हे तीन योग जीवनात आले की, विवेकानंद ही वृत्ती जागृत होणारच. हे तीन योग आपल्या जीवनात बानवायचे असतील तर विवेकानंदांच्या चरित्राचा अभ्यास करावा लागेल.
आजचा युवक ज्ञान आणि विज्ञान यांच्यावर विश्वास ठेवून जगणारा आहे, हे मानवी मूल्य व मानवी विकास याबाबत जाणीव असणारा आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधणारा आहे. फक्त आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा, शक्तीचा, क्षमतांचा वापर समाजहितासाठी, राष्ट्रनिर्माणासाठी झाला पाहिजे हे युवकांनी ठरविले पाहिजे. जे एक दिवस नक्कीच देशाचा सुवर्णकाळ परत आणतील यात शंकाच नाही. नाना प्रकारच्या आमिषांना, प्रलोभनांना, व्यसनांना बळी न पडता, आपली सकारात्मक ऊर्जा राष्ट्र निर्माणाच्या कार्यासाठी, समाजहितासाठी वापरायची नैतिकता ज्यांच्यात असते तो खऱ्या अर्थाने देशाचा आदर्श युवक होय. भविष्यातील देशाचा आधारस्तंभ होय. असे युवक ज्या देशात, ज्या समाजात राहतात, तो देश तो समाज बलवान होतो. आपला भारत देश हा जगातील सर्वांत तरुण युवकांचा देश म्हणून ओळखला जात आहे. कारण आपल्या देशातील युवकांची संख्या जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. कदाचित याच आत्मविश्वासाच्या जोरावर माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी भारत महासत्ता होण्याचे एक आशादायी स्वप्न पहिले होते. ते स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी विवेकानंदांच्या विचारांचे पाईक होऊ या.
शब्दांकन -
प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे
नगरप्रमुख, विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी, शाखा नाशिक
मो. नं. ९९२१९७६४२२