मुंबई : शिवडी-चेंबूर मार्गावरून सायन-पनवेल मार्गाला जोडणाऱ्या एव्हरार्डनगर येथील स्वामी नारायण उड्डाणपूल अनेक महिने दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. पावसाच्या सुरुवातीपासूनच या उड्डाणपुलावर मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली होती, परंतु आता पावसाळा संपूनदेखील या उड्डाणपुलाची कोणतीच डागडुजी अथवा देखभाल न झाल्याने उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत. यामुळे या मार्गावरून वाहने चालविणे धोक्याचे झाले आहे.
शिवडी-चेंबूर मार्गावरून या उड्डाणपुलावर प्रवेश करताच, सुरुवातीपासूनच वाहनांना खड्ड्यांचा सामना करावा लागतो. अचानक ब्रेक दाबल्याने वाहने मागून एकमेकांवर आदळण्याचे प्रकार घडत आहेत. उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने सर्व वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. रस्त्यामधील जोड मोठे झाल्याने वाहने जोरात आदळत आहेत. यामुळे वाहनचालकांना पाठीचे व मानेचे आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळेस उड्डाणपुलावरील दिवे बंद असल्याने अंधार पसरलेला असतो. दुचाकीस्वार व रिक्षाचालकांना जपून, तसेच एका बाजूने वाहने चालवावी लागतात.
उड्डाणपुलावरून वडाळा, शिवडी, कॉटन ग्रीन रे रोड, मशीद बंदरपर्यंत असलेल्या कंपन्यांचा माल वाहून नेणारी जड वाहने, तसेच इंधन कंपन्यांच्या टँकरची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती आहे. उड्डाणपुलाची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.