Join us

...आणि स्वानंद किरकिरेंच्या कवितेचे झाले गाणे; संगीतकार सलील कुलकर्णींनी शुभंकरच्या आवाजात संगीतबद्ध केले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 8:57 PM

राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार सलील कुलकर्णींनी मुलगा शुभंकरच्या आवाजात हे गाणे संगीतबद्ध केले आहे. 

मुंबई - 'तुम जाओ मत, रहो...' हे गीतकार, गायक, अभिनेते स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेले गाणे नुकतेच रसिकांच्या भेटीला आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार सलील कुलकर्णींनी मुलगा शुभंकरच्या आवाजात हे गाणे संगीतबद्ध केले आहे. 

आजवर स्वानंद किरकिरे यांच्या लेखणीतून अवतरलेल्या बऱ्याच गाण्यांनी संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेण्यात यश मिळवले आहे. आता 'तुम जाओ मत, रहो...' हि त्यांनी रचलेली कविता गाण्याचा साज लेऊन रसिकांच्या सेवेत रुजू झाली आहे. वयाच्या दोन-अडीच वर्षांपासून  'अग्गोबाई ढग्गोबाई'सारख्या तूफान लोकप्रिय झालेल्या अल्बमपासून शुभंकर गाणे गात आला आहे. आता त्याला स्वानंद यांनी लिहिलेले गाणे गाण्याची संधी मिळाली आहे. कवितेचे गाणे होण्याबाबत स्वानंद म्हणाले की, खरे तर मी गाणे नव्हे, तर कविता लिहिली होती. सलीलने त्याचे गाणे केले. आपले आवडते कोणीतरी जात असून, त्याला थांबवण्यासाठी लिहिलेली 'तुम जाओ मत, रहो...' ही कविता आहे. 

जाणारी व्यक्ती कोणीही असू शकते. ती प्रियकर-प्रेयेसी किंवा आणखी कोणीही असू शकते. त्यामुळे ती व्यक्ती आपल्याकडे कशी राहावी याचा विचार कविता लिहिताना केला आहे. एखाद्याने आपल्यासाठी कायमस्वरूपी कसे राहायला हवे. मग एखाद्या तलावात जसा आकाशाचा रंग सतत राहातो, आईच्या चेहऱ्यावरील आशीर्वाद कायम असतो, उदास डोळ्यांमध्ये जसे नेहमी पाणी राहाते तसे राहा असे सांगायचे आहे. या कवितेचे गाणे होईल असे वाटले नव्हते. ते सलीलने केले. त्याने लावलेली चाल बोलकी असून, शुभंकरने सुरेखरीत्या गायल्याचेही स्वानंद म्हणाले.

या गाण्यातील लहान-सहान जागा अत्यंत बाकाईने यायला जाव्यात यासाठी दोन महिने रिहर्सल केल्याचे सलील कुलकर्णी यांनी सांगितले. शुभंकरनेही वडीलांनी सांगितल्याप्रमाणे रिहर्सल केल्याने गाणे चांगले झाले आहे. शब्दांचा अर्थ समजून घेऊन गाण्याची कला शुभंकरला चांगल्या प्रकारे अवगत असल्याचे सलील यांचे म्हणणे आहे. फोटो : स्वानंद किरकिरे 

टॅग्स :सलील कुलकर्णी