स्वप्ना पाटकर यांना १४ तारखेपर्यंत पोलीस कोठड़ी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:06 AM2021-06-10T04:06:18+5:302021-06-10T04:06:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बोगस पदवीच्या आधारे रुग्णावर उपचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चित्रपट निर्मार्त्या स्वप्ना पाटकर यांना १४ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोगस पदवीच्या आधारे रुग्णावर उपचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चित्रपट निर्मार्त्या स्वप्ना पाटकर यांना १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तसेच त्यांच्याकडील सर्व पदव्यांंची पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत आहे.
व्यावसायिक आणि समाजसेविका गुरदीप कौर हरिंदर सिंग यांनी पाटकरविरोधात तक्रार केली होती. त्यांना मिळालेल्या निनावी पत्रात पाटकर हिने कानपूरच्या छत्रपती शाहू महाराज विश्व विद्यालयातून क्लिनिकल सायकॉलॉजी विषयात घेतलेली पदवी, ‘इन्फ्लुअन्स ऑफ इमोशन्स ऑन ह्यूमन माइंड : अ स्टडी बीयाँड प्रोब्लेम सॉल्व्हिंग अॅण्ड डिसिजन मेकिंग’ या विषयावर सादर केलेला प्रबंध, शहरातील नामांकित रुग्णालयात त्यांच्या नावापुढे त्यांनी विविध विषयांत केलेल्या अभ्यासाची माहिती, मुंबईतील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातील शिक्षण, त्यांच्या ट्विटर खात्यांवरील चाहत्यांची संख्या आदी तपशील या पत्रात होते, तसेच पाटकर यांनी रुग्ण, रुग्णालयासह समाजमाध्यमांवर जाहीर केलेली माहिती खोटी असल्याचाही दावा करण्यात आला होता.
त्यांनी खातरजमा केली तेव्हा पाटकर यांच्याकडील पदवी बोगस असल्याचे आढळले, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले. याच पदवीच्या आधारे त्या एका नामांकित रुग्णालयात ५ वर्षे रुग्णांवर उपचार करीत होत्या. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदविला. त्यात कानपूर विद्यापीठातून मिळविलेली पदवी बनावट असल्याचे स्पष्ट होताच मंगळवारी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यांनी आतापर्यंत किती रुग्णांवर उपचार केले, त्यांची काय परिस्थिती आहे, आदींबाबतही पोलीस तपास करणार असल्याचे समजते, तसेच त्यांच्याकडील सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.