Join us

मृत्यूशी दोन हात करून स्वप्नाली परतली

By admin | Published: September 04, 2014 2:16 AM

स्वप्नाली लाड हिच्या प्रकृतीमध्ये उत्तम सुधारणा झाली असून ती आता आपल्या घरच्यांबरोबर इतरांनाही ओळखू लागल्याने तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

ठाणो : तब्बल एक महिना तीन दिवस मृत्यूशी दोन हात केलेल्या स्वप्नाली लाड हिच्या प्रकृतीमध्ये उत्तम सुधारणा झाली असून ती आता आपल्या घरच्यांबरोबर इतरांनाही ओळखू लागल्याने तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. परंतु झालेल्या अपघाताविषयी तिला अद्यापही काही आठवत नसून तिच्या मेंदूला चालना मिळण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो, असे मत तिच्यावर उपचार करणारे न्युरोलॉजीस्ट डॉ. हर्षवर्धन पुरंदरे यांनी स्पष्ट केले.
1 ऑगस्ट रोजी रिक्षातून जाताना रिक्षाचालकाने चुकीच्या दिशेने रिक्षा नेल्याने भेदरलेल्या स्वप्नाली हिने चालत्या रिक्षातून उडी मारली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेविका उषा भोईर यांनी तिला ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले होते.  परंतु, मेंदूला जबर इजा झाल्याने ती कोमात गेली होती. मेंदूमध्ये रक्तस्त्रव होऊन गाठी झाल्या होत्या. त्यामुळे तिच्यावर  ठराविक अंतराने तीन शस्त्रक्रिया करुन तिच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या मेंदूतील रक्ताच्या गाठी व जमा झालेले पाणी बाहेर काढण्यात आले. शस्त्रक्रिया करुनही ती कोमात असल्याने तिला कृत्रिम लाइफ सपोर्टच्या सहाय्याने श्वास दिला जात होता. त्यानंतर पुढील दोन आठवडे तिची प्रकृती चिंताजनक होती. परंतु ती उपचाराला प्रतिसाद देत होती, असेही डॉ. पुरंदरे यांनी सांगितले. त्यामुळे तीन आठवडय़ानंतर कृत्रिम लाइफ सपोर्ट सिस्टीम हळूहळू बंद करण्यात आली. त्यानंतर फिजिओथेरपीच्या सहाय्याने तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून आता ती कुटुंबियांना आणि मित्र परिवाराला ओळखू लागली आहे. त्यांच्याशी संवाद साधत आहे. वॉकर धरुन चालू शकते, स्वत:च्या हातांनी खाऊ शकते, तसेच इतर दैनंदिन कामही करु शकत असून घडलेल्या दुर्दैवी घटनेचा तिला विसर पडला आहे. भूतकाळ मात्र तिला पूर्णपणो आठवत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. परंतु, संपूर्ण रिकव्हर होण्यासाठी तिला सहा महिन्यांचा कालावधी लागेल. तिच्या डोक्याचे हाड पुन्हा बसविण्याची एक छोटी शस्त्रक्रिया तीन महिन्यानंतर करण्यात येईल. (प्रतिनिधी)