मुंबई - रविवारी दिवसभर सोशल मीडियात एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. या व्हिडीओत काही तरुणांसोबत १८०० रुपयांवरुन घरकाम करणारी महिला भांडत असल्याचं दिसून येत होतं. सोशल मीडियात अनेकांनी हा व्हिडीओ गंमतीशीर आणि मनोरंजनासाठी शेअर केला होता. मात्र, अनेकांनी या व्हिडिओबाबत गंभीरपणे मत व्यक्त केलं आहे. या व्हिडिओतील महिलेची बाजू घेत अनेकांनी ट्रोलर्संना सोशल मीडियातूनच सल्ले दिले आहेत. अभिनेता स्वप्नील जोशीनेही या महिलेची बाजू घेत एका वाक्यात आपलं मत व्यक्त केलं.
सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल होऊन त्या काकूंची थट्टा उडवण्यात येत होती. या व्हिडीओत ती महिला घरकामाचे १८०० रुपये मागत होती, ज्या तरुणांशी ती भांडत होती त्यांनी १८०० रुपये दिल्याचं वारंवार सांगत होते. मात्र, काकू ऐकायला तयार नव्हत्या. यात तरुणांनी सांगितल्याप्रमाणे काकूंना ५०० च्या तीन नोटा, दोनशेची एक नोट आणि शंभराची एक नोट दिली असल्याचं सांगत होते. हे या काकूंनीही मान्य केले परंतु मला माझे १८०० रुपये हवेत असं त्यांचे म्हणणं होतं. या काकूंनी मला ५०० च्या तीन नोटा दिल्यात मी खोटं बोलणार नाही, दीड हजार आणि तीनशे दिलेत असं सांगितलं मग १८०० रुपये कुठे आहेत असं काकू विचारत होत्या. यावर तरुण त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते पण काकू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. काही मिनिटांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याबाबत अभिनेता स्वप्नील जोशीनेही टिंगलकरणाऱ्यांना सुनावले आहे.
त्यांचा फक्त पैशांचा हिशोब चुकलाय हो... आपल्यापैकी अनेकांचा आयुष्याचा हिशोब चुकलाय !!! मग आपण स्वतःवर किती हसलं पाहिजे!??
असे ट्विट स्वप्नील जोशीने केले आहे. स्वप्नीलने हा व्हायरल व्हिडिओ गंभीरतेने घेतला असून ट्रोलर्संना स्वत:मध्ये पाहण्याचा सल्लाच एकप्रकारे दिला आहे. दरम्यान, या व्हिडीओचा वापर करुन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. आर्थिक साक्षरता, घसरलेल्या जीडीपीवरुन राज्यातील सत्ताधाऱ्यांनी केंद्रातील विरोधकांना लक्ष्य केले होते.
महिला व बालकल्याण मंत्र्यांनी घेतली दखल
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीही यासंदर्भात फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही आमच्यासाठी आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत असंही मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले आहे.