Anushakti Nagar Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या दोन याद्यांमधून शरद पवार गटाने ६७ उमेदवारांची घोषणा केली होती. आता, तिसऱ्या यादीतून आणखी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अजित पवार गटात गेलेल्या नवाब मलिक यांच्या मुलीच्या विरोधातही शरद पवार यांनी उमेदवार दिला आहे. बॉलिवुड अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फहाद अहमद यांना अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडेही सर्वांचेच लक्ष लागलेलं असणार आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने अणुशक्तीनगर मतदारसंघातून सना मलिक शेख यांना तिकीट दिले आहे. सना मलिक या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फायर ब्रँड लीडर आणि प्रवक्त्या आहेत. सना मलिक ही राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची मुलगी आहे. सना मलिक अणुशक्ती नगर विधानसभेत सतत सक्रिय असतात. या मतदारसंघातही त्यांचा मोठा दबदबा आहे. त्या अनेकदा लोकांपर्यंत समस्या जाणून घेत आल्या आहेत. मुंबईतील अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ हा नवाब मलिक यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळेच अजित पवारांनी सना मलिक यांना तिकीट दिले आहे.
दुसरीकडे, शरद पवार यांनी आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून फहाद अहमद यांना संधी देण्यात आली आहे. फहाद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्करचे पती आहेत. फहाद अहमद यांनी समाजवादी पक्ष सोडून शरद पवार गटात प्रवेश केला आहे. फहाद अहमद यांच्या पक्षप्रवेशानंतर जयंत पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत भाष्य केलं. "अणुशक्तीनगर मतदारसंघात आमच्याकडे खूप चांगले कार्यकर्ते आहेत, मात्र फहाद अहमद हे काही महिन्यांपासून तिकडे स्थानिक आहेत. या उमेदवारीसाठी तेथील निष्ठावंत नाराज आहेत, मात्र राजकारणात संख्येला महत्त्व आहे," असं जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, शरद पवार गटाने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत नऊ उमेदवारांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या तिसऱ्या यादीची घोषणा केली.
तिसऱ्या यादीतील उमेदवार
१. कारंजा – ज्ञायक पाटणी२. हिंगणघाट – अतुल वंदिले३. हिंगणा - रमेश बंग४. अनुशक्तीनगर - फहाद अहमद५. चिंचवड – राहुल कलाटे६. भोसरी – अजित गव्हाणे७. माजलगाव – मोहन बाजीराव जगताप८. परळी - राजेसाहेब देशमुख९. मोहोळ - सिद्धी रमेश कदम