मुंबईकरांनी अनुभवला वायुदलाच्या सूर्यकिरणांचा थरार; अनेकांनी मोबाईलमध्ये टिपली छबी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 07:49 AM2021-10-19T07:49:27+5:302021-10-19T07:51:22+5:30
१९७१च्या भारत पाकिस्तान युद्धातील विजयाप्रीत्यर्थ स्वर्णिम विजय वर्षाचे औचित्य साधत, हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक पथकाच्या विमानांनी मुंबईच्या अवकाशात भरारी घेतली.
मुंबई : भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक पथकाच्या हवाई कसरतीचा थरार सोमवारी मुंबईकरांनी अनुभवला. गेटवे ऑफ इंडिया, वरळी सी लिंक आणि अंधेरी भागात कमी उंचीवरून उड्डाण करणाऱ्या या विमानांची छबी अनेक मुंबईकरांनी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात टिपली.
१९७१च्या भारत पाकिस्तान युद्धातील विजयाप्रीत्यर्थ स्वर्णिम विजय वर्षाचे औचित्य साधत, हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक पथकाच्या विमानांनी मुंबईच्या अवकाशात भरारी घेतली. दुपारी ३.४० ते ३.५० या अवघ्या दहा मिनिटांच्या या कसरती पाहण्यासाठी वरळी सी फेस, दादर चौपाटीवर उत्सुक मुंबईकरांनी हजेरी लावली होती, तर कुलाबा, वांद्रे, अंधेरी पट्ट्यातील अनेक नागरिकांनी आपापल्या इमारतीवरून हे उड्डाण अनुभवले. अनेक मुंबईकरांनी उत्साहाने या कसरतींचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. एरोबॅटिक टीमची चार विमाने मुंबईतील कसरतीत सहभागी झाली होती. एरोहेड फाॅर्मेशनमध्ये ही विमाने उडत होती. रविवारी पुण्यातही या पथकांनी मनोवेधक कसरती केल्या. एकूण नऊ विमाने यात सहभागी होणार होती. मात्र, प्रतिकूल वातावरणामुळे केवळ चार विमाने आजच्या कवायतीत होती. मुंबईवरून ही विमाने पुढे गोव्याला रवाना झाली. तिथून कर्नाटकातील बिदर येथील हवाई दलाच्या तळावर ही विमाने परतणार आहेत.