लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनी, २६ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांची जम्मूमध्ये शाखा सुरू केली जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रसारासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
स्वा. सावरकरांनी वयाच्या पंधराव्या वर्षी नाशिकनजीकच्या भगूर या आपल्या मूळ निवासस्थान असलेल्या गावामधून त्यांनी देशकार्याचा विडाच उचलला होता. त्यासाठी त्यांनी इतक्या यातना सहन केल्या की, पन्नास वर्षांच्या दुहेरी जन्मठेपेच्या शिक्षेलाही ते सामोरे गेले. अंदमानातील तुरुंगामध्ये अमानवी अशा छळालाही त्यांनी झेलले. क्रांतिकार्यासाठी जगभरात स्वा. सावरकर यांनी फिरून तसेच भारताच्या सर्व भागात जाऊन सभा घेतल्या. त्यांच्या या मोहिमांमध्ये जुलै १९४२ मध्ये त्यांनी जम्मूलाही भेट दिली होती. जम्मूतील जनतेला व त्यांच्या नव्या पिढीला देशाच्या मुख्य प्रवाहात सामावता यावे, बळकट करावे आणि भारताच्या ऐतिहासिक संपत्तीला समृद्ध करता यावे या उद्दिष्टातून जम्मू येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईची शाखा सुरू करण्यात येत आहे. जम्मूची ही शाखा सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सहकार्यवाह स्वप्निल सावरकर यांच्या उपस्थितीत स्थापन केली जाईल.
सावरकरांची तीन गाणी नव्या पिढीकडून सादर
यानिमित्ताने स्वा. सावरकर यांची तीन हिंदी गीते नव्या स्वरूपात सादर केली आहेत. यूट्युबवर ती प्रक्षेपित केली जाणार आहेत. यामध्ये ‘जयोस्तुते’ हे आर्या आंबेकर यांनी गायले आहे तर ‘अनादी मी’ जयदीप वैद्य यांनी गायले आहे. ही दोन्ही गाणी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यानी भाषांतरित केली आहेत. तर याशिवाय ‘ने मजसि ने’या स्वा. सावरकर यांच्या मराठी गाण्याचे ‘ले चल मुझको’ हे हिंदी भाषांतर समीर सामंत यांनी केले असून ते शंकर महादेवन यांनी म्हटले आहे. या गाण्यावर उर्मिला कानिटकर यांनी नृत्य सादर केले आहे. नृत्यदिग्दर्शक मनीषा जीत आहेत . या तीनही गाण्याच्या संगीतकार वर्षा भावे आणि संगीत दिग्दर्शक कमलेश भडकमकर आहेत.