Join us

सावरकरांची हस्तलिखिते पाहिली का?; '१८५७चे स्वातंत्र्यसमर' पुस्तकाची मूळ प्रत वस्तुसंग्रहालयात जतन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 12:42 PM

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती शनिवारी झाली.

- समीर परांजपे

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले '१८५७चे स्वातंत्र्यसमर' हे विलक्षण गाजलेले पुस्तक तसेच त्यांनी अंदमानच्या सेल्युलर कारागृहामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना उर्दू भाषेत लिहिलेल्या गझला यांची मूळ हस्तलिखिते दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात नीट जतन करून ठेवण्यात आली आहेत.  

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती शनिवारी झाली. दादर शिवाजी पार्क परिसरातील सावरकर सदन या निवासस्थानाच्या तळमजल्यावर स्वा. सावकरांच्या नित्यवापरातील वस्तू, त्यांना मिळालेली मानपत्रे अशा गोष्टींचे एक वस्तुसंग्रहालयही उभारले आहे. यातून त्यांचा जीवनपट सर्वांसमोर उभा राहातो.

कारागृहात लिहिल्या उर्दू गझला-

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना लिहिलेल्या उर्दू गझलांचे हस्तलिखित त्यांनी १९२१ साली सेल्युलर कारागृहाचे लिपिक प्यारेलाल यांना १९२१मध्ये दिले होते. त्यांनी ही वही सावरकरांचे सहकारी श्री. पु. गोखले यांच्याकडे दिली. त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्या व प्रख्यात निवेदिका मंजिरी मराठे यांना ती वही श्री. पु. गोखले यांच्या कागदपत्रांत मिळाली. ती त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाकडे सुपूर्द केली आहे. या वहीची पाने आता जीर्ण झाली आहेत. या वहीच्या प्रथम काही पानांवर गांधीजी, लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बुद्ध अशा अनेकांची चित्रे चिटकवलेली आहेत. या वहीचे आता उत्तम जतन स्मारकाने केले आहे.

काय काय आहे सावरकर वस्तुसंग्रहालयात?

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दादर येथे सावरकर सदन हे निवासस्थान आहे. त्या वास्तूत उभारलेल्या वस्तूसंग्रहालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राजकीय, सामाजिक जीवनातील अनेक प्रसंगांची दुर्मीळ छायाचित्रे, त्यांना मिळालेली मानपत्रे, सावरकरांचे जपून ठेवलेले कपडे, त्यांचे शूज, छत्री, चष्मा, टोपी तसेच त्यांचे समग्र साहित्य अशा साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील.

पुस्तकानेही भोगल्या यातना-

लंडनमध्येच लिहिलेल्या या ग्रंथावर ब्रिटिशांनी प्रकाशनापूर्वीच बंदी आणली होती. ब्रिटिशांनी सावरकरांना अटक केल्यानंतर या ग्रंथाचे मूळ हस्तलिखित मादाम कामा यांनी फ्रान्समधील बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. कालांतराने कामा यांनी ते ‘अभिनव भारत’चे सदस्य डॉ. कुटिन्हो यांच्याकडे सुपुर्द केले.  डॉ. कुटिन्हो यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते सावरकरांकडे पाठविले. १९५० मध्ये मराठीत हा ग्रंथ प्रकाशित झाला. 

टॅग्स :मुंबई