स्वाती महाडिक यांना आडगावमध्ये मोफत घराची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 01:45 PM2018-04-13T13:45:03+5:302018-04-13T13:45:03+5:30

सैन्यात जाऊन नवा जन्म मिळाला असे स्वाती महाडिक यांनी सांगितले.

Swati Mahadik receives a free house visit to Adgaon | स्वाती महाडिक यांना आडगावमध्ये मोफत घराची भेट

स्वाती महाडिक यांना आडगावमध्ये मोफत घराची भेट

googlenewsNext

मुंबई: लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडिक यांना संघवी पार्श्व ग्रुप आणि सीमा संघवी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई-नाशिक द्रुतगती मार्गावरील आडगाव येथील संघवी गोल्डन सिटी या परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पात मोफत घराची भेट देण्यात आली आहे. काल मुंबईत पार पडलेल्या सोहळ्यात अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्या हस्ते स्वाती महाडिक यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ही घोषणा करण्यात आली. 
 
 2017 मध्ये लष्करामध्ये दाखल झालेल्या ले. स्वाती महाडिक यांचा गौरव हे या कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्य होते. 2015 मध्ये वीरमरण आलेल्या व त्यांच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी मरणोत्तर शौर्यचक्र देण्यात आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या स्वाती महाडिक या पत्नी. स्वाती यांनी परिस्थितीशी सामना केला व त्या लष्करात भरती झाल्या. त्यांचा हा प्रवास केवळ त्यांच्या दोन मुलांसाठी व कुटुंबासाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना लेफ्टनंट महाडिक म्हणाल्या, माझा सत्कार करायची अनेकांना इच्छा असते. अनेक जण मला मुलाखतीसाठी बोलावतात. त्यांना मी एवढेच सांगेन की माझी नोकरी फक्त १४ वर्षांसाठी आहे. माझे पती लष्करात होते तेव्हा मी वेगळी नोकरी करीत होते. हा पूर्ण भिन्न असा पेशा आहे. त्यामुळे मला खूप काही शिकायचे आहे. त्यातील सहा महिने आता पूर्ण झाले आहेत. फक्त साडेतेरा वर्षे उरलीत आहेत. आता कुठे माझा शिकण्याचा काळ सुरू झाला आहे. दिवसाचे २४ तासही शिकण्यासाठी कमी पडतात. देशसेवा करतानाच मुलांकडे लक्ष द्यायचे, त्यांना शिकवायचे, सिंगल पॅरेंटस् म्हणून त्यांना वाढवायचे. सैन्यात जाऊन नवा जन्म मिळाला असे स्वाती महाडिक यांनी सांगितले.
 
संघवी पार्श्व ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रमेश संघवी यांनी सांगितले की, आमच्यासाठी आजचा दिवस अभिमानास्पद आहे.  इतक्या वर्षांत कठोर परिश्रमांद्वारे साध्य केलेली ब्रँडची परंपरा व विश्वास संघवी पार्श्वच्या माध्यमातून पुढेही कायम ठेवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही आमच्या ब्रँडला नवी ओळख दिली आहे आणि नावीन्यपूर्ण व ताजेतवाने राहण्यासाठी कंपनीला नवी चेतना दिली आहे. आमच्या नव्या ओळखीमुळे भविष्यातील आमच्या अनेक प्रकल्पांना चालना व नवा उत्साह मिळेल. माझ्या मुली आज माझ्यासोबत उद्योगात उतरल्या आहेत आणि त्या उद्योगाची पुढील वाटचालीसाठी योगदान देणार असल्याचा आनंद शब्दात सांगता येणार नाही. माझ्या बहिणीच्या नावाने स्थापण्यात आलेल्या सीमा संघवी वेल्फेअर फाउंडेशनबद्दल आमचे कुटुंब विशेषतः समाधानी आहे. माझ्या बहिणीला यामुळे खूप आनंद झाला असता. महाडिक व सेन या दोन साहसी महिला आज आमच्यासोबत आहेत हा आमचा सन्मान आहे. आमचा समूह आज जे साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचे त्या प्रतिक असल्याचे रमेश संघवी यांनी म्हटले. 
 
सुश्मिता सेन म्हणाल्या, संघवी पार्श्वने गेल्या इतक्या वर्षांत केलेल्या कार्यामुळे नव्हे; तर आजपासून सुरू केलेल्या नव्या वाटचालीमुळे संघवी पार्श्वने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना मला खरेच खूप आनंद वाटला. विशेषतः सीमा संघवी वेल्फेअर फाउंडेशनने हाती घेतलेल्या कामाचा मला अभिमान वाटतो. महाडिक यांच्या शौर्याला खरेच सलाम करायला हवा. त्यांनी दाखवलेले साहस अपवादात्मक व वैशिष्ट्यपूर्ण आहे. दोन मुलींचा आई म्हणून, त्यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणे माझ्यासाठी गौरवास्पद असल्याचे सुश्मिता सेनने सांगितले.
 

Web Title: Swati Mahadik receives a free house visit to Adgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.