मुंबई - स्वाती म्हसे-पाटील यांनी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गुरुवारी दादासाहेब चित्रनगरी परिसराची पाहणी केली. या पाहणी दरम्यान सुरु असलेली विकासकामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश सबंधित विभागांना दिले आहेत.
चित्रीकरणासाठी दिवसरात्र कार्यरत असणाऱ्या या महामंडळाच्या अंतर्गत परिसरातील रस्त्यांची डागडुजी, पाच कलागारांची ( स्टुडीओ ) नूतनीकरणांचे कामकाज सध्या सुरु आहे. ही कामे वेळेत पूर्ण करण्याबरोबरच पावसाळ्यापूर्वीची कामेदेखील वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी विभागाला दिल्या.
त्यांनी शिवशाही प्रकल्प, गुरुकुल जागा, साई, वेलकम, जोश मैदान आदि चित्रीकरणस्थळे तसेच प्राईम फोकस जागा, एमडी बंगलो, मेक-अप रूम, मंदिर, आठ ते अकरा कलागारे आदी ठिकाणांची स्थळ पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सह व्यवस्थापकीय संचालक संजय कृष्णाजी पाटील, उप अभियंता (स्थापत्य) विजय बापट, सहाय्यक (कलागारे) मोहन शर्मा, मुख्य सुरक्षा अधिकारी संजय दामोदर पाटील यांच्यासह स्थापत्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.