मुंबई : मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी आपण पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही, असे म्हणत पुणे विभागाच्या उपमहानिरीक्षक (कारागृह विभाग) स्वाती साठे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे फेटाळले. स्वाती साठे यांच्यासह जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्या लहाने व भायखळा कारागृहाचे अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर मंगळवारी किल्ला कोर्टात उपस्थित होते. लहाने आणि इंदुलकर यांनी उत्तर देण्यासाठी २८ सप्टेंबरपर्यंत न्यायालयाकडून मुदत मागून घेतली.मंजुळा शेट्येला ज्या काठीने मारहाण करण्यात आली ती काठी व अन्य पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न स्वाती साठे यांनी केल्याचा आरोप भायखळा कारागृहातील कैदी मरिअम शेख यांनी केला आहे. तसेच शेखने डॉ. तात्या लहाने व कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर यांच्यावरही मरिअमने आरोप केले आहेत. साठे, डॉ. लहाने व इंदुलकर यांची लाय डिटेक्टर टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट व नार्को अॅनालिसीस टेस्ट करण्यात यावी, यासाठी मरिअम यांनी अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत किल्ला कोर्टात अर्ज केला आहे.शेट्येच्या मारेकºयांना वाचविण्यासाठी कारागृह अधिकाºयांनी सतत प्रयत्न केले. त्यामुळे या सर्वांची (साठे, डॉ. लहाने व इंदुलकर) या घटनेतील भूमिका समजावी, यासाठी त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, असे मरिअमने अर्जात म्हटले आहे.मरिअमच्या या अर्जावर साठे यांनी तीन पानी उत्तर न्यायालयापुढे सादर केले. ‘बदनामी करण्यासाठी असा अर्ज दाखल करण्यात आला आहे. मी पुणे विभागाची डीआयजी आहे. त्यामुळे मुंबईतील कारागृह माझ्या अधिकारक्षेत्रात येत नाही. याबाबत मुंबई पोलिसांनी चौकशी केली आहे. त्यांच्या चौकशी अहवालाशी माझा काहीही संबंध नाही,’ असे म्हणत साठे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. भायखळा कारागृह अधिकाºयांनी शेट्येला मारहाण केली. तिच्यावर वेळीच वैद्यकीय उपचार न झाल्याने तिचा मृत्यू झाला.
स्वाती साठेंनी सर्व आरोप फेटाळले, लहाने, इंदुलकर यांना उत्तर देण्यास २८ सप्टेंबरपर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 2:11 AM