विमानतळावर सव्वादोनशे तोळे सोने जप्त
By Admin | Published: March 23, 2017 02:00 AM2017-03-23T02:00:38+5:302017-03-23T02:00:38+5:30
दोन दिवसांत मुंबई विमानतळावर केलेल्या पाच वेगवेगळ्या कारवायांत ६५ लाख रुपये किमतीचे सव्वादोनशे तोळे सोने जप्त
मुंबई : दोन दिवसांत मुंबई विमानतळावर केलेल्या पाच वेगवेगळ्या कारवायांत ६५ लाख रुपये किमतीचे सव्वादोनशे तोळे
सोने जप्त करण्यात आले आहे. गुप्तांगात हे सोने लपवून ठेवले होते. दुबई, हाँगकाँग येथून या सोन्याची तस्करी करण्यात आली होती.
हवाई गुप्तचर यंत्रणेने ही कारवाई केली आहे. सोमवारी केलेल्या पहिल्या कारवाईत केरळचा रहिवासी असलेल्या इब्राहीम मन्सुर कोलीकरा मोहमद (३१)च्या झडतीत ५८३ ग्रॅम सोने जप्त केले होते. त्याने दुबईवरून मुंबईत या सोन्याची तस्करी केली होती.
त्यापाठोपाठ बेहरीन येथून आलेल्या मनोज अशोकलाल वटवाणी (२४) याच्याकडून २३२ ग्रॅम सोने जप्त केले. तो उल्हासनगर येथील रहिवासी आहे. तर वडोदराचा मयूर हरेश कुमार तेवानी (३३) याच्याकडून ९०० ग्रॅम सोने हस्तगत केले.
मंगळवारी केलेल्या कारवाईत उल्हासनगरच्या दीपक खियानीकडून (२५) ३०० ग्रॅम सोने तर दुबईहून आलेल्या रियाज अब्दुल सतार मेमन याच्याकडून २३२ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.
विदेशातून होत असलेल्या सोने तस्करीत ही मंडळी हे सोने गुप्तांगात लपवून ठेवतात असे अनेकदा होते. येथील सोने वेळीच न काढल्यास त्याचा फटका त्यांना बसू शकतो, असे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)