Join us

अखेर ३९व्या दिवशी मुहूर्त; आज मंत्रिमंडळ विस्तार, राजभवनच्या दरबार हॉलमध्ये शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 6:48 AM

भाजपकडून गुजरात पॅटर्न आणून सर्व नवीन चेहरे दिले जातील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा गेले ३८ दिवस रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी ११ ला राजभवनवर होणार आहे.  राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. शपथविधी समारंभासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आदींना निमंत्रण देण्यात आले आहे.  

भाजपकडून गुजरात पॅटर्न आणून सर्व नवीन चेहरे दिले जातील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. पण दिग्गजांना पुन्हा स्थान देत या चर्चेला पूर्णविराम देण्यात आला आहे. तथापि, जयकुमार रावल, डॉ. संजय कुटे या दोन ज्येष्ठ सदस्यांना पहिल्या टप्प्यात स्थान दिले जाणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. रावल आणि कुटे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात. 

गृह, वित्त, महसूल भाजपकडे सा. प्रशासन, नगर विकास,  कृषी खाते शिंदे गटाकडे!

सामान्य प्रशासन, नगर विकास, उद्योग, कृषी ही खाती मुख्यमंत्री शिंदे गटाकडे तर गृह, वित्त, महसूल, सार्वजनिक बांधकाम ही खाती भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. विस्तारानंतर सायंकाळी खातेवाटप जाहीर केले जाईल. गृह आणि वित्त ही खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहतील, असे मानले जाते. शालेय शिक्षण, ग्रामविकास, आदिवासी विकास हे भाजपकडे तर उच्च शिक्षण शिंदे गटाकडे जाऊ शकते. जलसंपदा शिंदे गटाकडे तर महसूल भाजपकडे जाऊ शकते.

संभाव्य मंत्र्यांची नावे

भाजपतर्फे : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, माधुरी मिसाळ, संभाजी पाटील निलंगेकर, सुरेश खाडे, मंगल प्रभात लोढा, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण.मुख्यमंत्री शिंदे गटाकडून : उदय सामंत, दीपक केसरकर, दादा भुसे, संजय राठोड, संजय शिरसाट, तानाजी सावंत, संदिपान भुमरे, शंभुराज देसाई.

शिंदे यांच्याकडून सस्पेन्स कायम

भाजप वा शिंदे यांच्याकडून कोणतेही नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नाही. रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत नावे निश्चित होतील, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या गटातून कोणाला संधी मिळणार याबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यांच्या गटाच्या आमदारांची बैठक मंगळवारी सकाळी ९ वाजता म्हणजे शपथविधीपूर्वी होणार आहे. त्यात शिंदे हे अधिकृतपणे नावे जाहीर करतील, असे सूत्रांनी सांगितले. शिंदे यांच्याकडून कोणत्याही आमदारास रात्री उशिरापर्यंत फोन गेलेला नव्हता. 

‘नंदनवन’ बंगल्यावर अडीच तास खलबते

विस्तारासंदर्भात सोमवारी सकाळपासूनच हालचालींना वेग आला. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दुपारी अडीच तास शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर बंदद्वार चर्चा करून मंत्रिमंडळ विस्ताराला अंतिम स्वरूप दिले. त्यानंतर शिंदे हे नांदेडला रवाना झाले. फडणवीस यांनी भाजपकडून संधी दिली जाणार असलेल्यांना फोन केले. मंगळवारी सकाळी शपथविधी झाल्यानंतर दुपारी १ ला राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल, अशी शक्यता आहे. दुपारी ३ ला विधानभवनात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार होती. मात्र ती रात्री रद्द करण्यात आली. अधिवेशन १० ऑगस्टपासून सुरू करण्याचा आधी निर्णय झालेला होता; पण आता अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याने ही बैठकही रद्द करण्यात आली.

विधान परिषद सदस्य पहिल्या टप्प्यात नाहीत!

विधान परिषद सदस्यांना विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपकडून संधी दिली जाणार नाही, अशी माहिती आहे. शिंदे गटाचा विधान परिषदेत अधिकृत एकही आमदार नाही.  

चंद्रकांत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद कोणाला? 

चंद्रकांत पाटील मंत्री झाल्यानंतर नवीन प्रदेशाध्यक्ष पदासाठी आशिष शेलार यांचे नाव आघाडीवर आहे. ओबीसी चेहरा म्हणून चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. संजय कुटे यांची नावे चर्चेत आहेत.

पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता असून कामकाज सल्लागार समिती मंगळवारी त्यावर बैठकीत शिक्कामोर्तब करेल.

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सरकार