सीमा महांगडे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेकडे आधुनिक व स्मार्ट तंत्रज्ञानावर आधारित यंत्रसामग्री उपलब्ध असतानाही पालिकेच्या सफाई कामगारांना मॅनहोलच्या घाणीत उतरून भूमिगत गटारांची सफाई करावी लागत आहे. शहरात पावसाळ्यापूर्वी मुंबईच्या २४ वॉर्डांतील लहान, मोठ्या नाल्यांची, गटारांची सफाई पालिका करत असली तरी त्यासाठी अनेक ठिकाणी सफाई कामगारांना उतरवून त्यांच्याकडून हाताने मैला साफ करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंबंधी सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांकडून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे मुंबई महापालिका प्रशासन आणि प्रशासक आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबईत शेकडो किमीच्या भूमिगत मलवाहिन्या असून, त्यांच्या सफाईसाठी अनेक वर्षांपासून कामगार मॅनहोलमध्ये उतरविले जातात. मॅनहोलमधील विषारी वायूमुळे अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर काहींना श्वसनाचे विकार घेऊनच उर्वरित आयुष्य जगावे लागते. सरकारने १९९३ आणि २०१३ मध्ये कायद्यानुसार मॅन्युअल स्कॅव्हेंजरला बंदी घातली. मात्र, पालिकेकडून अद्यापही अनेक वॉर्डात आजही या मॅनहोलमध्ये सफाई कामगारांना उतरवून ते हाताने गाळ आणि मैला बाजूला करताना दिसून येत आहेत.
मॅन्युअल स्कॅव्हेंजर म्हणजे काय ? एखाद्या व्यक्तीला स्थानिक अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे मानवी मल-मूत्र जमा होत असेल अशा मोकळ्या नाल्या, गटारे किंवा खड्डे स्वच्छ करायला लावल्यास, त्या कामाला ‘मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग’ म्हणतात.
यंत्राचे काय झाले ?
वर्ष २०२१-२२
३०० मिमी व्यासाच्या मलवाहिन्यांच्या सफाईसाठी २४ सफाई यंत्रे.६०० मिमी व त्यापेक्षा मोठ्या व्यासाच्या मलवाहिन्यांच्या सफाईसाठी उच्च क्षमतेची ०३ सफाई यंत्रे.मलवाहिन्यांच्या तक्रारींचे जलदगती निवारण करण्यासाठी सात जलद प्रतिसाद वाहने आणि आधुनिक तंत्रज्ञानाने गाळ व मैला काढण्यासाठी तीन उपसा यंत्रे खरेदी करण्याचे निश्चित केले.यंत्रे सुशोभीकरणासाठी वापरली जात आहेत का, असा सवाल गोवंडी सिटीजन्सचे फैय्याज आलम शेख यांनी विचारला.
मुंबई, ठाण्याला जोडणाऱ्या लालबहादूर शास्त्री मार्ग तसेच गोवंडी, वांद्रे, जुहू परिसरातील मोठी गटारे साफ करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. हे काम करण्यासाठी पुरुष गटारात उतरत आहेत, तर गटाराबाहेर उभ्या असलेल्या महिला बाहेर काढला जाणारा गाळ एका बाजूला ओतत असतात. सकाळी ९ नंतर गटार सफाईला सुरुवात होऊन दुपारच्या उन्हात सुरू असलेल्या या कामादरम्यान ही मंडळी घरून येतानाच पाण्याच्या बाटल्या आणि जेवणाचे डबे घेऊन येतात. मात्र, काम त्यांना भर उन्हात करावे लागते. जेवणासाठी वेगळी अशी जागा नसल्याने सफाईच्या ठिकाणीच जेवतात. विविध सेवाभावी संस्था आणि कंत्राटदारांकडून सफाई कामगारांची नेमणूक करण्यात येते. यामध्ये तरुण मुलींप्रमाणे मध्यमवयीन महिलाही राबतात.
पालिकेकडे सफाई कामगारांना या गटारात उतरवून सफाई करून घेण्याशिवाय गाळ काढण्यासाठी काही पर्याय नाही का? याचा त्या कामगारांच्या आरोग्यावर किती परिणाम होतो याची कल्पना पालिकेला आहे का? पालिकेने अशी कामे करून घेणाऱ्या संस्था, कंत्राटदारांवर कारवाई करून त्यांचे कंत्राट रद्द करायला पाहिजे. शिवाय लवकरात लवकर ही मानवी पद्धतीने गाळ आणि मैला साफ करण्याची पद्धत बंद करायला हवी. - फैय्याझ आलम शेख, अध्यक्ष, गोवंडी न्यू अंगम सोसायटी