मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने एन्ट्री केली की, नाक्यानाक्यावर मक्याचे कणीस खरपूस भाजून त्यावर मीठमसाला लावून देणाऱ्या ठेल्यांची चिक्कार गर्दी व्हायची. मात्र गेल्या काही वर्षांपासून असे ठेले कमी होत असून, मोबाइलवर अडकून पडलेली तरुणाई आता स्वीट कॉर्नमध्ये अडकली आहे. त्यात भर म्हणून अलीकडे देशी मक्याचे वाण गायब झाले आहे. म्हणून की काय स्वीट कॉर्न कोबला मागणी वाढल्याचे चित्र आहे.
मुंबईसारख्या शहरात ज्वारी, मका आणि बाजरीची भाकरी खाण्याचे प्रमाण तसे कमीच आहे. अगदीच नावाला किंवा हॉटेलमध्ये जाऊन भाकरी खाण्याचा ट्रेंड सध्या आहे. मुळात हा ट्रेंड नाही. कारण भाकरी ही आपल्या आयुष्याची गरज आहे. परंतु दगदगीच्या आयुष्यात पोटभर घासही खाता येत नसल्याने स्वीट कॉर्नचे वेड वाढले आहे.
१५ रुपयांना भुट्टागेल्या काही वर्षांत भुट्ट्याची किंमतदेखील वाढली आहे. पाच वर्षांपूर्वी भुट्टा १० रुपये होता. आता साहजिकच किमतीमध्ये वाढ झाली असली तरी पहिल्यासारखी चव नसल्याचे खवय्यांचे म्हणणे आहे.
हायब्रिड वाणाला मागणीहायब्रिड वाणामुळे उत्पादन अधिक निघते. एका एकरात अधिकाधिक उत्पादन कमविण्यासाठी हायब्रिडचा वापर केला जातो. शिवाय या पिकाला पाणीदेखील जास्त लागत नाही. त्यामुळे हायब्रिड उत्पादन घेण्यावर भर दिला जातो.
मक्याचे देशी वाण गायबअन्नधान्याचे अधिकाधिक उत्पादन मिळावे यासाठी मक्याचे विदेशी वाण वापरले जाते. केवळ महाराष्ट्र असे नाही तर देशभरात हीच पध्दत वापरली जाते. मुळात मका हे सर्वात स्वस्त धान्य आहे. आणि त्याची लागवड प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत केली जाते. मक्याची भाकरी किंवा तत्सम पदार्थ मक्यापासून बनविले जात असले तरी अगदी सुरुवातीला देशी वाणाची जी चव होती ती मात्र विदेशी वाणाला नाही.
दहा ते एक वर्षापूर्वी पावसात भिजत मक्याचे कणीस खाणे ही खवय्येगिरी होती. किंवा लोक त्यावर तुटून पडत होते. मात्र आता ही सगळी स्टाईल झाली आहे. मोठ्या मॉलमध्ये जाणे आणि तिथे स्वीट कॉर्न खाणे म्हणजे आपले स्टेटस वाढले, असे होते. त्यामुळे लोक चवीला आणि पोटाला नाही तर स्टेट्ससाठी स्वीट कॉर्न खातात, अशी अवस्था आहे.- शीतल कुराडे, गृहिणी