मधुमेही रुग्णांसाठी गोड बातमी; कृत्रिम स्वादुपिंड करणार इन्सुलिननिर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 02:55 AM2019-03-26T02:55:34+5:302019-03-26T02:56:04+5:30
मधुमेहाच्या रुग्णांसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), मुंबई येथील संशोधकांकडून गोड बातमी आहे. त्यांनी मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी पॉलिमरपासून एक जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित केले आहे जे शरीरात प्रत्यारोपित केले जाऊ शकते.
मुंबई : मधुमेहाच्या रुग्णांसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), मुंबई येथील संशोधकांकडून गोड बातमी आहे. त्यांनी मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी पॉलिमरपासून एक जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित केले आहे जे शरीरात प्रत्यारोपित केले जाऊ शकते. उंदरावर (माउस मॉडेल) हा प्रयोग १०० टक्के यशस्वी झाला असून, भविष्यात इतर जातीच्या प्राण्यांमध्ये ह्या स्वादुपिंडाचा उपयोग करण्याची योजना असल्याची माहिती या संशोधनाचे प्रमुख संशोधक जयेश बेल्लारे यांनी दिली.
जगातील सर्वाधिक, म्हणजेच जवळ जवळ चार कोटी मधुमेहाचे रुग्ण असलेल्या भारताला ‘मधुमेहाची राजधानी’ असे म्हटले जाते. अन्नातील कर्बोदकाचे विघटन ग्लुकोजमध्ये होऊन शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. हे विघटन करण्यासाठी स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन नावाचे संप्रेरक आवश्यक असते. मात्र, मधुमेहाच्या रुग्णांत पर्याप्त मात्रेत इन्सुलिन निर्माण होत नाही. यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर इन्सुलिन इंजेक्शन, इन्सुलिन पंप किंवा स्वादुपिंडाचे प्रत्यारोपण करण्याचा सल्ला देतात. काही रुग्णांत स्वादुपिंडात इन्सुलिन निर्माण करणाऱ्या आयलेट सेलचे प्रत्यारोपण केले जाते. मात्र प्रत्यारोपण करण्यात सर्वांत मोठी समस्या म्हणजे आपले शरीर कृत्रिम स्वादुपिंडाला साथ देत नाही. परिणामत: शरीरातील रोगप्रतिकार प्रणाली क्रियाशील होऊन कृत्रिम स्वादुपिंडाच्या कार्याचा दर्जा खालवतो.
या संंशोधनात पॉलिमरच्या तंतूचे पोकळ पटल वापरून एक जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित केले आहे, ज्याला शरीराची रोगप्रतिकार प्रणाली स्वीकारते आणि ज्यात इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशी निर्माण होतात. बाळाच्या नाळेतून घेतलेल्या मानवी स्टेम पेशी आणि डुकराच्या स्वादुपिंडातून घेतलेल्या आयलेट पेशी वापरून संशोधकांनी कृत्रिम स्वादुपिंडाची चाचणी केली. संशोधकांनी हे कृत्रिम स्वादुपिंड मधुमेह असलेल्या उंदरात प्रत्यारोपित केले आणि त्यांच्या असे निदर्शनास आले की उंदराच्या इतर अवयवांना त्याचा काहीही त्रास झाला नाही. उंदराच्या रोगप्रतिकार प्रणालीने स्वादुपिंडावर हल्ला केला नाही तसेच स्वादुपिंडामधील पेशींवर रक्त वाहिन्या निर्माण होताना दिसत असल्याची माहिती जयेश बेल्लारे यांनी दिली. या संंशोधनाच्या पुढच्या टप्प्यासाठी फार्मास्युटीकल कंपन्यांची मदत आवश्यक असून मदतीसाठी आवाहन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
आणखी काही अवधी लागणार
- या संंशोधनामुळे टाइप १ मधुमेह असलेल्या ५,४२,००० पेक्षा अधिक जणांचे आयुष्य सुधारू शकते. मात्र प्रत्यक्षपणे हे जैव-कृत्रिम स्वादुपिंड वापरायला अजून थोडा अवधी लागेल.
- मधुमेहाच्या उपचारासाठी आयलेट पेशींचे प्रत्यारोपण हा एक पर्याय म्हणून उपलब्ध असायला अजून बराच अवधी आहे, पण योग्य सामग्री आणि पेशीचा योग्य प्रकार वापरल्यास हे स्वप्न सत्यात अवतरू शकते, अशी प्रतिक्रिया या संशोधनाचे प्रमुख संशोधक जयेश बेल्लारे यांनी दिली.
- मधुमेहाच्या रुग्णांसाठी मात्र ही निश्चितच गोड बातमी ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.