एमएमआरडीएचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहरातून १७ किलोमीटर लांबीची मिठी नदी वाहत असून, मिठी नदी स्वच्छता उपक्रमासह नदीचे सौंदर्यविषयक काम वाढविण्यासाठी एमएमआरडीएने टप्प्याटप्प्याने सुंदर प्रकल्प विकसित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये पाण्याची गुणवत्ता सुधारणे, फ्लोटिंग कचरा नदीत शिरण्यापासून रोखणे हे प्राथमिक लक्ष्य असेल. त्याबरोबरच, रिव्हर फ्रंटच्या सुशोभिकरणाच्या दिशेनेही एमएमआरडीए काम करत आहे. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव आणि इतर अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण केले.
मिठी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, खडक खोदाई, संरक्षक भिंत, सर्व्हिस रोड, सुशोभीकरणाची कामे यापैकी बहुतांश कामे सुरू आहेत. आता मिठी नदी अधिकाधिक स्वच्छ करण्यावर भर दिला जात आहे. मिठी नदीचा उगम विहार व पवई जलाशयाच्या प्रवाहातून होत असून या नदीची लांबी १७.८४ किमी आहे. ती सीप्झ, मरोळ, अंधेरी, आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी खालून वाहते. त्यानंतर बैलबाजार, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुलातून माहीम खाडीद्वारे १५ पुलांच्या खालून वाहत अरबी समुद्राला मिळते. मिठी नदीचे पाणलोट क्षेत्र ७ हजार २९५ हेक्टर आहे. उगम स्थानी ती समुद्र सपाटीपासून २४६ मीटर उंच आहे. मिठी एकूण १७.८४ किमी लांब असून, यापैकी ११.८४ किमी लांबीचा भाग हा मुंबई महापालिकेच्या अधिपत्याखाली तर ६ किलोमीटर लांबीचा भाग हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित आहे. हा ६ किमी भाग भरतीच्या प्रवाहाअंतर्गत येतो. मिठी स्वच्छ, साफ आणि सुंदर करण्यासाठी प्रयोग केले जात असतानाच मिठी नदीच्या बायो फायटो रेमेडियेशन प्रकल्पाचा काही महिन्यांपूर्वी शुभारंभ करण्यात आला आहे.
* या कामांना देणार प्राधान्य
- शाश्वत वृक्षारोपण केले जाईल. यात स्थानिक वनस्पतीचा समावेश केला जाईल.
- जैव अभियांत्रिकी तंत्रज्ञानाद्वारे दूषित नदी स्वच्छ केली जाईल.
- पर्यावरणपूरक जैविक अभियांत्रिकी उपाय म्हणजे नदी तट सुशोभिकरण करणे होय.
- दुर्गंधीमुक्त वातावरण निर्माण केले जाईल.
- माती आणि पाण्यातील विषारी, हानिकारक पदार्थांचा नाश करण्यासाठी सजीव हिरव्या वनस्पतींचा वापर केला जाईल.
.................