सुहास शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भावा-बहिणीच्या नात्यातील वीण घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. एकमेकांपासून दूर असलेली भावंडे यादिवशी आवर्जून भेटतात, पण गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनावर कोरोनाचे सावट असल्याने, त्यात खंड पडू न देण्यासाठी टपाल विभागाने पुढाकार घेतला आहे.
दरवर्षी लाखो बहिणींनी त्यांच्या लाडक्या भाऊरायासाठी पाठविलेल्या राख्या वेळेत पोहोचविण्याचे काम पोस्टामार्फत केले जाते. कोरोनाच्या काळात माणसांच्या मुक्त संचारावर निर्बंध आल्याने ही संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्यभरात विशेष नियोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सर्कलच्या मेल विभागाचे सहायक संचालक मनोज साळवे यांनी दिली.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील टपाल कार्यालयांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राख्यांच्या जलद हाताळणीसाठी ‘राखी बाय स्पीडपोस्ट’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भावा-बहिणीच्या नात्यात आणखी गोडवा आणण्यासाठी रंगीबेरंगी पाकिटांसह, वॉटरप्रूफ आणि टेम्परप्रूफ कव्हर्स सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याशिवाय लोकजागृतीसाठी बॅनर, पोस्टर, स्टँडी जागोजागी लावण्यात आल्या आहेत. दूरचित्रवाणी, रेडिओच्या माध्यमातून जिंगल्सद्वारेही माहिती पोहोचविली जात आहे.
कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये राख्या खोळंबून राहू नयेत, यासाठी परिचलन व्यवस्था उभारण्यात आली आहेत. महत्त्वाच्या टपाल कार्यालयांत राख्यांसाठी विशेष खिडक्या राखून ठेवल्या आहेत, शिवाय राख्यांची पाकिटे अलग करण्याचा वेळ वाचविण्यासाठी वेगळ्या बॅग्ज देण्यात आल्या आहेत. राख्या वेळेत पोहोचविण्यासाठी कटऑफ तारीख ठरविण्यात आली आहे. त्यानुसार, राज्यासाठी १७ ऑगस्ट आणि परराज्यांत राख्या पाठविण्यासाठी १६ ऑगस्ट ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत राखी आमच्यापर्यंत पोहोचल्यास कोणत्याही अडथळ्यांविना रक्षाबंधनाच्या आधी ती संबंधितांपर्यंत पोहोचेल, अशी माहिती साळवे यांनी आली.
.........
तत्काळ राख्या पोहोचविण्यासाठी यंत्रणा
- गेल्या वर्षी महाराष्ट्र सर्कलकडे १ कोटी २१ लाख राख्या आल्या होत्या. त्यानुसार, यंदाचे नियोजन करण्यात आले आहे.
- तत्काळ राख्या पोहोचविण्यासाठी विशेष वितरण व्यवस्था, राखी मेलसारखी सुविधा प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यासाठी विशेष टीम तयार केली आहे.
- कोरोनाच्या काळातील निर्बंधांमुळे काही सोसायट्यांच्या आवारात प्रवेश देण्यास मनाई करीत असल्यामुळे काही अडचणी जाणवत असल्याचेही साळवे यांनी नमूद केले.
.......
- गेल्या वर्षी किती राख्या पोहोचविल्या - १ कोटी २१ लाख
- राज्यातील पोस्ट कर्मचारी - ३८ हजार
- राज्यातील पोस्ट कार्यालये - ३००
.........
रक्षाबंधन कधी - रविवार, २२ ऑगस्ट