Join us

ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी झाला; साखर महाग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:10 AM

निखिल सावंतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : श्रावण हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावणात उपवास आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये ...

निखिल सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : श्रावण हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावणात उपवास आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये गोड पदार्थ बनवावे लागत असतात. याच कारणास्तव श्रावण महिना सुरू होताच साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र आता साखरेच्या दरांमध्ये काही महिन्यांपासून चढउतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांमध्येही गृहिणींना साखरेचा वापर जपून करावा लागत आहे. मागील काही महिन्यांमध्ये साखरेच्या किमती कडाडल्यामुळे ग्राहकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. मुंबईला इतर शहरांच्या तुलनेत रोज जास्त साखर लागते अन् या महिन्यांत साखरेची मागणी वाढते.

विविध दुकाने तसेच घरांमध्ये गोड पदार्थ जास्त बनवले जात असल्यामुळे रोज हजारो क्विंटल साखर शहराला लागते. श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार, नागपंचमी, श्रीकृष्ण जयंती, दहीहंडी यांसारखे अनेक सण येत असल्यामुळे घरात गोड पदार्थ मोठ्या प्रमाणात बनविले जातात. यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत श्रावणात साखरेची मागणी वाढते.

भाव का वाढले या संदर्भात विचारणा केली असता साखरेचे विक्रेते शाबू जाणा म्हणाले की, सध्या पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. याचा फटका साखरेच्या आयात-निर्यातीवर बसला आहे. या कारणास्तव साखरेचे दर २ ते ४ रुपयांनी वाढले आहेत. परिणामी आम्हाला प्रतिगोणी १०० ते १२० रुपये जास्तीचे मोजावे लागत आहेत.

॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰

गृहिणींचे बजेट कोलमडले

श्रद्धा पारकर - श्रावण महिन्यात सण-उत्सव साजरा करण्याचा उत्साह असतो. अनेकांची व्रतवैफल्ये सुरू होतात. त्यामुळे घराघरांमध्ये गोडधोड सुरू असते. पण सध्या महागाई खूप वाढली आहे. साखर ही सणासुदीला गोड पदार्थ करण्यासाठी वापरली जाते. आता साखरेचा वापर करताना हात आखडता घ्यावा लागत आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

प्राजक्ता गावकर : कोरोनाच्या काळात महागाई वाढली आहे. अन्नधान्याचे दर वाढले आहेत. जानेवारी महिन्यापासून ते ऑगस्ट महिना येईपर्यंत साखरेच्या भावामध्ये चढउतार पाहावयास मिळत आहेत. सरकारने या दरांवर नियंत्रण आणायला हवे.

॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰

साखरेचे दर (प्रतिकिलो)

जानेवारी - ३६

फेब्रुवारी -३७

मार्च - ३६

एप्रिल - ३६

मे - ३६

जून - ३७

जुलै - ३७

ऑगस्ट - ४०