स्वीगी, झोमॅटो, ओला, उबेरने थकविले ३.६ कोटींचे इचलान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:07 AM2021-03-08T04:07:03+5:302021-03-08T04:07:03+5:30
डिलिव्हरी करताना वाहतूक नियमांचे उल्लंघन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांनी थकीत इचलान वसुलीची मोहीम सुरू ...
डिलिव्हरी करताना वाहतूक नियमांचे उल्लंघन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांनी थकीत इचलान वसुलीची मोहीम सुरू केली आहे. त्याची सुरुवात ऑनलाइन डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्यांपासून केली. थकीत इचलानबाबत कंपन्यांना पत्र पाठवण्यात आले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी डिलिव्हरी ॲप कंपन्यांकडे एकूण ३.६ कोटींचे इचलान थकले आहे. यात सिग्नल मोडणे, नो पार्किंग झोनमध्ये पार्किंग, वाहन चालविताना फोनवर बोलणे या व अन्य कारणांचा समावेश आहे.
एकूण थकीत ३.६ कोटींच्या इचलानमध्ये ओला, उबेर वाहन चालकही आहेत. उबेरचा १.२१ कोटी, तर ओला चालकांचा ६० लाख दंड आहे, तर फूड डिलिव्हरी देणाऱ्या झोमॅटोच्या चालकांनी सिग्नल मोडणे, नो पार्किंग झोनमध्ये पार्किंग, वाहन चालवताना फोनवर बोलणे, वन-वे लेनमधून गाडी चालवणे या नियमांचे उल्लंघन केले आहे. वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार स्वीगीच्या वाहनचालकांचे १.४८ आणि झोमॅटो वाहनचालकांचे ३१ लाख रुपयांचे इचलान थकले आहे.
एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण ३१९ कोटींचे इचलान थकले आहे. वाहतूक पोलिसांच्या कॉल सेंटरद्वारे लोकांना इचलान भरण्यास सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे स्वीगी, झोमॅटो, ओला, उबेर यांनाही थकीत दंड भरण्यास सांगितले आहे.
* थकीत रक्कमेबाबेत बैठक
स्वीगी, झोमॅटो, ओला, उबेरच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांच्या नावाने चालविल्या जाणाऱ्या वाहनांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असून, त्याचे इचलान थकीत आहे. थकीत रक्कम लवकरात लवकर भरावी असे, त्यांना सांगण्यात आले.
- प्रवीण पडवळ,
अतिरिक्त पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग
.......................