विधान परिषदेवर घेण्याचे CM शिंदेंचे आश्वासन; अंधेरी पूर्वमधून स्वीकृती शर्मांनी मागे घेतली उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 05:07 PM2024-11-04T17:07:40+5:302024-11-04T17:38:13+5:30

Swikriti Sharma : स्वीकृती शर्मा यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

Swikriti Sharma withdrew her candidature as an independent candidate from Andheri East Assembly Constituency | विधान परिषदेवर घेण्याचे CM शिंदेंचे आश्वासन; अंधेरी पूर्वमधून स्वीकृती शर्मांनी मागे घेतली उमेदवारी

विधान परिषदेवर घेण्याचे CM शिंदेंचे आश्वासन; अंधेरी पूर्वमधून स्वीकृती शर्मांनी मागे घेतली उमेदवारी

Andheri East Assembly Constituency : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने आपापल्या बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्याचे जोरदार प्रयत्न केले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने पराभव टाळण्यासाठी बंडखोरांची मने वळवली आहेत. मुंबईतून मोठ्या चेहऱ्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यापैकी पहिले नाव एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्माचे आहे. स्वीकृती शर्मा यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या विरोधात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र आता स्वीकृती शर्मा यांनी उमेदवारी मागे घेतला आहे.

माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनीही उमेदवारी मागे घेतली आहे. भविष्यात विधानपरिषद सदस्य होण्याच्या आश्वासनावर स्विकृती शर्मा यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला.रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या सभेत मंचावरून घोषणा केली होती की, भविष्यात स्वीकृती शर्मा यांना विधानपरिषद सदस्य बनवण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेले आश्वासन पूर्ण करतील, असा विश्वास प्रदीप शर्मा आणि स्वीकृती शर्मा यांनी व्यक्त केला आहे.

"मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानू इच्छितो. गेली १० वर्षे आम्ही समाजसेवेत आहोत. आम्हाला एका मोठ्या व्यासपीठावर काम करण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला विधानपरिषद सदस्य पद देण्याचे आश्वासन दिले आहे," असं स्वीकृती शर्मा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाला आहे. या मतदारसंघातून शिवसेनेतून स्वीकृती शर्मा इच्छुक होत्या. स्वीकृती शर्मा यांनी अंधेरी पूर्व मतदारसंघातून लढण्यासाठी जोरदार तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी स्वीकृती शर्मा यांच्या नावाऐवजी  भाजपच्या मुरजी पटेल यांना शिवसेनेतून उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आलं होतं. मुरजी पटेल यांचं नाव पुढे येताच स्वीकृती शर्मा यांनी त्यांच्या समर्थकांची बैठक बोलावत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्वीकृती शर्मा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर स्वीकृती शर्मा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
 

Web Title: Swikriti Sharma withdrew her candidature as an independent candidate from Andheri East Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.