तलावात पोहले, अनेकांचे दात पडले; अतिरिक्त क्लोरिनमुळे झाले त्वचेचे विकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 09:38 AM2024-01-04T09:38:47+5:302024-01-04T09:40:58+5:30
दादर येथील महात्मा गांधी जलतरण तलावाची पार दुरवस्था झाली असून, या तलावात पोहणे म्हणजे आरोग्याशी खेळ झाला आहे.
मुंबई : दादर येथील महात्मा गांधी जलतरण तलावाची पार दुरवस्था झाली असून, या तलावात पोहणे म्हणजे आरोग्याशी खेळ झाला आहे. तलावाच्या पाण्यातील अतिरिक्त क्लोरिनमुळे काही सदस्यांच्या दातांची झीज होत आहे, तर काहींनी दात पडल्याच्या तक्रारी केल्या आहेत. तसेच अनेकांच्या अंगावर पुरळ येणे, चट्टे उमटत आहेत. हे प्रकार वाढू लागल्याने सुमारे १५० सदस्यांनी तलावाच्या प्रशासकीय कार्यालयावर धडक मारत पाण्याच्या खराब दर्जाबद्दल तक्रारी केल्या असून, हे तलाव पोहण्यासाठी धोकादायक बनल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
जलतरण ऑलिम्पिक दर्जाचा असल्याने राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील अनेक नामांकित जलतरणपटू इथे सरावासाठी येतात, मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पाण्याच्या दर्जाविषयी तक्रारी येऊ लागल्या आहेत. येथे राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक तलावात पोहण्यासाठी येणाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते.
वॉटर पोलोचा संघही इथे सरावासाठी येतो. इथे प्रशिक्षण घेऊन अनेकांनी राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवली आहे. काही जण पाच -पाच तास कसून सराव करतात. परंतु आता त्यांचा सरावच धोक्यात आला आहे. इथे सरावासाठी येणाऱ्या १८ वर्षाच्या तरुणाचे सर्व दात क्लोरिनमुळे खराब झाल्याची त्याची तक्रार आहे. दातांवरील उपचारासाठी त्याला अडीच लाख रुपये खर्च आला आहे. क्लोरिनमुळे दातांवर बसवलेल्या ‘’टूथ गार्ड’’चा आकार बदलत असल्याच्या, गॉगल न लावता पोहल्यास डोळे चुरचुरल्याच्या तक्रारी आहेत. काहींना डॉक्टरांनी पोहणे थांबवण्यास सांगितले आहे.