मुंबईतील जलतरण तलावांची दुरवस्था; चौकशी करण्याचे महापौरांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 03:33 AM2019-12-13T03:33:31+5:302019-12-13T03:33:34+5:30

महासभेत पडसाद

Swimming pool facilities in Mumbai; Mayor's order to investigate | मुंबईतील जलतरण तलावांची दुरवस्था; चौकशी करण्याचे महापौरांचे आदेश

मुंबईतील जलतरण तलावांची दुरवस्था; चौकशी करण्याचे महापौरांचे आदेश

Next

मुंबई : मुलुंड (प.) येथील महापालिकेच्या जलतरण तलावात क्लोरीन गळतीच्या घटनेत बाधित आठ लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशा घटनांसाठी प्रशासनाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा हल्लाबोल सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत गुरुवारी केला. बहुतांशी तरण तलावाची दुर्दशा झाली असतानाही प्रशासनाने डोळ्यांवर झापडे का लावली आहेत. तरण तलावाच्या दुरुस्तीची फाइल का पुढे सरकत नाही, असा जाब अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांना नगरसेवकांनी विचारला. याची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला दिले.

मुलुंड येथील प्रियदर्शनी जलतरण तलावात बुधवारी संध्याकाळी क्लोरीन गॅसची गळती होण्याचा धक्कादायक प्रकार घडला. तरण तलावात पोहण्यासाठी आलेल्या जलतरणपटूंपैकी आठ जणांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यांना तत्काळ नजीकच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशा घटनेला प्रशासन जबाबदार असून पालिकेच्या मालकीच्या सर्व जलतरण तलावांची दुरुस्ती करण्याची मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्याचे समर्थन करीत पालिका प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट बघत आहे का, असा संतप्त सवाल केला. या तलावाच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करून दुरुस्तीची फाइल अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे आहे. ही बाब निदर्शनास आणून ही फाइल कुठे अडकली आहे, असा सवाल राऊत यांनी सिंघल यांना विचारला.

दादर येथील ऑलिम्पिक दर्जाचे तरण तलाव पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून बनवले. तेथे राज्य स्तरावरीलही स्पर्धा होत नाहीत. त्या पुलाचा दर्जाही राखण्यात आलेला नाही. या तरण तलावाची प्रशासन आणि महापौरांनी पाहणी करावी, अशी सूचना भाजपचे प्रकाश गंगाधरे यांनी केली. वारंवार पत्रव्यवहार करूनही या तरण तलावाची दुरुस्ती केली जात नाही.

दुरुस्ती करणे शक्य नसेल तर लोकांचे पैसे परत द्या, अशी मागणी स्थानिक नगरसेविका समिता कांबळे यांनी केली. या संकुलात लग्न समारंभ होतात, यापैकी छोटी रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात येते. तरण तलावाची देखभाल करणाऱ्या संस्थेकडून आर्थिक ताळेबंद मागविण्यात यावा, अशी सूचना भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी केली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश महापौरांनी या वेळी दिले.

दादर, कांदिवली, दहिसर, घाटकोपर, चेंबूर, मुलुंड आणि अंधेरी या ठिकाणी पालिकेचे जलतरण तलाव आहेत. यापैकी मुलुंडचे प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल आणि अंधेरीच्या शहाजी राजे क्रीडा संकुलाची देखभाल ललित कला प्रतिष्ठानमार्फत करण्यात येते.
२००२ मध्ये महापालिकेने मुलुंडच्या जलतरण तलावाची दुरुस्ती केली होती. यासाठी एक कोटी ३८ लाख रुपये खर्च करण्यात आले होते.

तसेच येथील कालिदास नाट्यगृहावर ३८ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी निदर्शनास आणले.
घाटकोपर ते मुलुंड येथील रहिवासी प्रियदर्शनी जलतरण तलावात पोहण्यासाठी येतात. वार्षिक आठ हजार रुपये प्रत्येक सभासदाकडून घेण्यात येतात. तब्बल पाच हजार जलतरणपटू येथे येतात.

Web Title: Swimming pool facilities in Mumbai; Mayor's order to investigate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.