मुंबई : ‘मिशन बिगिन अगेन’ अर्थात ‘पुन:श्च हरिओम’ नुसार राज्यातील स्विमिंग पूल, व्यायामशाळा (जिम) आणि शॉपिंग मॉल सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. आरोग्य विभाग त्यासाठी मार्गदर्शक सूची तयार करत असून अंतिम निर्णय मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असेही टोपे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यात सध्या ३१ जुलै पर्यंत काही प्रमाणात लॉकडाऊन आहे. मात्र, मिशन बिगिन अगेनअंतर्गंत अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरु केल्या जात आहेत. त्यानुसार सध्या बंद असलेले स्विमिंग पूल, जिम आणि शॉपिंग मॉल सुरु करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. जिम हे जनतेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे काही नियम-अटींच्या शर्र्थींवर स्विमिंग पूल, जिम आणि शॉपिंग मॉल सुरू केले जाऊ शकतात, असे टोपे यांनी सांगितले.
लोकल सुरु करण्याची मागणी
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हालाही रेल्वेने प्रवास करण्याची मुभा द्या, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. यासाठी शेकडो संतप्त प्रवाशांनी नालासोपारा येथे जोरदार आंदोलन केले. यावर टोपे म्हणाले, लोकल सेवा सुरु करण्याची मागणी अगदीच रास्त आहे. मात्र, ट्रेनमध्ये सोशल डिस्टनसिंग पाळले जाणार नाही, त्यामळे लोकल ट्रेन सुरु करायच्या की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.
पुण्यातही मिशन झिरो : मुंबई प्रमाणे पुण्यात देखील मिशन झिरो मोहीम राबविण्यात येत आहे. कोविड सेंटरमध्ये महिलांवर अत्याचाराच्या घडलेल्या घटना असल्याने त्या सेंटरवर पूर्ण सुरक्षा दिली आहे. कोणत्याही हॉस्पिटलला रुग्णांना नाकारता येणार नाही. आता पंधरा मिनिटात रिपोर्ट मिळतील अशा टेस्ट आल्या आहेत. त्याचे किट सर्व खाजगी हॉस्पिटल्सने ठेवावे. रुग्णांना तपासून दाखल करून घ्यावे. मात्र रुग्णांना परत पाठवून देण्याची तक्रार आली तर अशा व्यवस्थापनावर देखील योग्य ती कारवाई केली जाईल, असे टोपे यांनी सांगितले.
मी अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प नाही- उद्धव ठाकरे
मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसल्यापासून अनेक संकटं आणि आव्हानांचा सामना करत आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर आता कोरोनाशी लढाई सुरू आहे. ही लढाई देखील आपण जिंकू, असा आत्मविश्वास व्यक्त करतानाच, जनतेला वाºयावर सोडून द्यायला मी काही अमेरिकेचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नाही, अशी मिश्कील टिपण्णी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खा. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत केली. ही मुलाखत अद्याप प्रसिद्ध व्हायची आहे.
मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर पडत नाहीत, या आरोपावरही ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. सध्याच्या काळात प्रत्येकाने सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्याची गरज आहे. मी स्वत:च जर त्याचे उल्लंघन केले तर इतरांना काय सांगणार? असे मुख्यमंत्री म्हणाले.